कोंढापुरी येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज गुरुवार दि.२ एप्रिल २०२६ रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात ग्रामस्थांकडून साजरा करण्यात आला. भजनी मंडळाच्या उपस्थितीत पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत हनुमान मंदिराशेजारील सभागृहात हनुमान जन्माचे भजन म्हणण्यात आले. सकाळी सुर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोंढापुरी येथील हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी साजरा करण्यात येतो. हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मुर्तीला शेंदूर,तेल लावण्यात आले. रूईची माळ घालण्यात आली.पुष्पहार घालण्यात आला. हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी हनुमान मुर्तीला अगरबत्ती ओवाळून, मंदीराबाहेर श्रीफळ फोडून,प्रदक्षिणा घालून हनुमान मुर्तीचे दर्शन घेतले. हनुमान जन्मोत्सव,चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदीर,हनुमान मंदीर,भैरवनाथ मंदीर,गणपती मंदिर,गावचे प्रवेशद्वार,ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय,गावांतर्गत रस्त्याच्या कडेला आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. हनुमान जन्माची माहिती अशी सांगितली जाते की,अंजना नावाची एक अप्सरा होती. भगवान इंद्र यांच्या दरबारात ती काम करायची.तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खूश होते.तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात. तेव्हा अंजना सांगते की,हे देवा तुम्ही मला भेटलेल्या शापापासून माझी मुक्ती करून द्या. तेव्हा ब्राम्हजीने विचारल्यावर अंजना सांगते की,ती एकदा बालक रूपात पृथ्वीवर खेळत असताना तिने एका वानराला तपस्या करताना बघितले.तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून तिने त्याच्यावर काही फळे फेकली.त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली. त्या ऋषिंनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला शाप दिला ती कोणाच्या प्रेमात पडेल त्याच क्षणी ती वानर बनेल.तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्या शापापासून मुक्ती करावी. तेव्हा त्या ऋषींनी तिला सांगितलं मी हे शाप मागे घेवू शकत नाही.तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानर मुखी माणूस असेल.हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की,हे अंजना मी तुला या शापापासून मुक्त करू शकत नाही. पण तुला एक सांगतो की, तु काही काळासाठी पृथ्वीवर जावून राहा तिथे तुला तुझे पती भेटतील तु लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवची उपासना कर. पुत्र जन्म झाल्यावर तुला या शापापासून मुक्तता मिळेल.अंजना पृथ्वीवर जावून राहू लागते.एके दिवशी दूरवर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो.ती त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्या माणसाने तिच्याकडे पाहताक्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते. हे बघून अंजना रडू लागते. तो मनुष्य तिच्या जवळ येतो. तिची विचारपूस करू लागतो.अंजना तिच्या शापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते तेव्हा तिला वानरमुखी मनुष्य दिसतो.तेव्हा तो मनुष्य सांगतो की, तो माणूस नाही.तो वानरांचा राजा केसरी आहे. त्याला भगवान शिव कडून वरदान भेटले आहे.त्याने तिला त्याच्या सोबत लग्न करायला सांगितले.अंजना आणि केसरी जंगलात लग्न करतात.तिथे ते एकत्र राहू लागतात. भगवान ब्रम्हाने सांगितल्याप्रमाणे अंजना पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात. तिला वरदान देतात की,ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील. त्यामुळे ऋषीने दिलेल्या शापापासून तिची मुक्तता होईल. एके दिवशी अंजना भगवान शंकराची पूजा करते.आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो. तेव्हा अग्निदेव प्रसन्न होवून वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो.त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो.राजा दशरथ त्यांची पत्नी कौसल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते.ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते.हे वादळ वायूदेव घडवून आणतात. वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिव मंत्र जपत असलेल्या अंजनीच्या हातात पडते. भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजना ते पायस प्राशन करते. काही दिवसानंतर अंजनाला एक वानर मुखी पुत्राचा जन्म होतो. हे बघून राजा केसरी खूप आनंदीत होतो. पुत्रजन्मामुळे अंजना,ऋषीने दिलेल्या शापापासून मुक्त होते. ती ब्रम्ह लोकांत निघून जाते. हनुमान जन्माची ही घटना सुर्योदयाच्या वेळी चैत्रपौर्णिमेला घडली म्हणून या दिवशी हनूमान जयंती साजरी केली जाते अशी माहिती सांगितली जाते.