• Total Visitor ( 84258 )

हरियाणात धक्का, तरी महाराष्ट्रात काँग्रेसच "दादा";  घटविला ठाकरे + पवारांचा वाटा

Raju tapal October 18, 2024 50

हरियाणात धक्का, तरी महाराष्ट्रात काँग्रेसच "दादा"; 
घटविला ठाकरे + पवारांचा वाटा!!

मुंबई :-हरियाणात धक्का, तरी महाराष्ट्रात काँग्रेसच "दादा"; घटविला ठाकरे पवारांचा वाटा!! असे म्हणायची वेळ काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या जागा वाटपांच्या आकड्याने आणली आहे.हरियाणात पराभवाचा धक्का बसल्यानंतर देखील काँग्रेसची महाराष्ट्रातले "दादागिरी" कमी झाली नसून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी साधता आली नाही, असेच आकडेवारीतून समोर आले आहे.

महाविकास आघाडीतल्या जागावाटपाची आकडेवारी काही मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीने 215 जागांचे वाटप पूर्ण केले असून त्यामध्ये 84 जागा काँग्रेसच्या वाट्याला आणि प्रत्येकी 65 जागा ठाकरेंची शिवसेना आणि पवारांचे राष्ट्रवादी यांच्या वाट्याला आल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले आहे. उर्वरित 73 जागांमध्ये देखील काँग्रेसची "दादागिरी" कायम राहण्याची शक्यता त्याच बातम्यांमध्ये वर्तविण्यात आली आहे. या आकडेवारीचा हिशेब नीट लावला, तर हरियाणातल्या पराभवाच्या धक्क्यानंतर काँग्रेसला वाकविण्याची संधी ठाकरे आणि पवार यांना साधता आली नाही, असेच दिसून येते.

उद्धव उद्धव ठाकरे तर महाराष्ट्रात पहिल्या नंबरचा पक्ष म्हणून भाजपबरोबरच्या युतीत 151 जागांच्या खाली यायला तयार नव्हते, पण आता महाविकास आघाडी त्यांच्या वाट्याला ट्रिपल डिजिट देखील जागा येण्याची शक्यता उरलेली नाही, हे निदान सुरुवातीच्या आकड्यांमधून दिसते. पवारांच्या राष्ट्रवादीचा डिजिट बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते पहिल्यापासूनच डबल डिजिट म्हणजे 50 - 60 जागांमध्येच अडकून पडलेले नेतृत्व आहे. त्यामुळे पवारांनी जागा वाटपाच्या वाटाघाटींमध्ये किंवा नंतरच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटींमध्ये काँग्रेस सारख्या मातब्बर पक्षावर मात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पण हरियाणातल्या पराभवाच्या धक्क्यानंतरही काँग्रेसला महाराष्ट्रात वाकविण्यात ठाकरे आणि पवार दोघेही अपयशी ठरले, उलट काँग्रेसचे केंद्रीय पातळीवरचे आणि महाराष्ट्रातले नेते त्या पराभवातून लवकर सावरले असेच चित्र जागावाटपाच्या आकड्यांच्या बातम्यांमधून तरी समोर आले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement