हिंमत असेल तर शिवसेना भवनाजवळ पाय ठेवून दाखवा ; ठाकरे गट आक्रमक
मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. त्यामुळे ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आणि पक्षाचा धनुष्यबाण हवा. मग बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबीयांना त्रास का देता? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पाठिशी ठाकरे गटाच्या या रणरागिणी उभ्या आहेत.” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनाजवळ एकटे येऊन या ठिकाणी पाय ठेवून दाखवावे. आई जगदंबा एकनाथ शिंदेंना पुन्हा रिक्षा चालवायला लावेल. त्यांना कधीही शांतता लाभणार नाही. एकनाथ शिंदेंनी कितीही खटले दाखल केले, तरी आम्ही शिवसैनिक घाबरणार नाही. उद्धव ठाकरेंना त्रास देऊन चांगले केले नाही. आजारी असतानासुद्धा ते खूप काम करतात. एकनाथ शिंदेंचे कधीही चांगले होणार नाही. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला संपवायला निघालात, तुम्ही कधीही सुखी होणार नाही, अशी घणाघाती टीकाही महिला कार्यकर्त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. “पंतप्रधान मोदी चहा विकत होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मोठे केले. त्यांच्याच मागे एकनाथ शिंदे गेले. तुम्ही मुंबई खरेदी करायला येणार आणि आम्ही तुम्हाला मुंबई देऊ? अद्यापही निवडणुका लावल्या नाहीत. या लोकांनीच गेम केला. इतकी वर्षे मोदी आणि शहा येत नव्हते, आताच कसे यायला लागले? मुंबई घेण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीत शिवसैनिक त्यांची सगळी ताकद दाखवतील.” अशी टीकाही त्यांनी केली.