• Total Visitor ( 764625 )
News photo

टिटवाळ्यात मध्यरात्री १२ नंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरूच...

Raju Tapal publisher November 07, 2026 13

टिटवाळ्यात मध्यरात्री १२ नंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरूच...



ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक हैराण,नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई होणार का? ठाणे ग्रामीण पोलिसांच्या आवाहनानंतरही नागरिकांचा सवाल...



राजू टपाल.



टिटवाळा :- दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा होत असताना टिटवाळा परिसरात मात्र रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे,रात्री १२ वाजल्यानंतरही काही ठिकाणी फटाके फोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तसेच संबंधित प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. मात्र,या वेळेच्या मर्यादेचे पालन होत नसल्याचे टिटवाळ्यातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,आजारी व्यक्ती आणि रात्रीच्या वेळी विश्रांती घेणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान,फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पुढाकार घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.नागरिकांना फटाक्यांच्या प्रदूषणासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



तसेच ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या controlroom.thane.r@mahapolice.gov.in आणि सुरक्षा शाखेच्या security.thane.r@mahapolice.gov.in या ई-मेलवरही तक्रार करता येणार आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात तसेच डायल ११२ वाहनामध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राप्त तक्रारींवर केलेल्या कारवाईचा अहवाल दररोज सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.



नियम नेमके काय सांगतात?



फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही निर्धारित वेळ पाळणे आवश्यक आहे.शांतता क्षेत्रातील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी.एकीकडे ठाणे ग्रामीण पोलीस प्रदूषणाविरोधात नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन करत आहेत,तर दुसरीकडे टिटवाळ्यात मध्यरात्री १२ नंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



मग रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार?



पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी टिटवाळ्यातील नागरिकांकडून होत आहे.सण साजरा करण्याचा आनंद प्रत्येकाला मिळायला हवा,मात्र एका व्यक्तीच्या आनंदासाठी दुसऱ्याच्या शांततेचा आणि आरोग्याचा बळी जाऊ नये,एवढीच अपेक्षा...


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement