तलावांचा श्वास कोंडतोय... प्रशासनाला जाग कधी?
मासुंदा,उपवन तलाव परिसरात २४ तास प्रदूषण मोजणीची मागणी; निसर्गसत्ता पर्यावरण संस्थेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन...
ठाणे :- दिवाळीच्या जल्लोषात तलावांचे शहर असलेल्या ठाण्याचा निसर्ग प्रदूषणाच्या विळख्यात सापडू नये,यासाठी मासुंदा व उपवन तलाव परिसरात २४ तास वायू आणि ध्वनी प्रदूषण मोजणी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी निसर्गसत्ता पर्यावरण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वैज्ञानिक आकडेवारीसह प्रदूषणावर नियंत्रण आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दिवाळी उत्सवादरम्यान फटाक्यांची आतषबाजी, डीजे, ध्वनिक्षेपक, वाहनांची वर्दळ आणि धुळीमुळे दोन्ही तलाव परिसरातील पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेल्या उपवन तलाव परिसरातील ध्वनिप्रदूषणाचा परिणाम पक्षी,वन्यजीव आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर होऊ शकतो. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दोन्ही ठिकाणी २४ तास हवा गुणवत्ता मोजणी यंत्रणा उभारून धूलिकणांसह उपलब्ध प्रदूषकांची नोंद घ्यावी आणि त्याची थेट आकडेवारी डिजिटल डिस्प्लेवर प्रसिद्ध करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच ठाणे पोलिसांनी ध्वनिमापन यंत्रणा कार्यान्वित करून डेसिबल पातळीची नोंद सार्वजनिक करावी. ध्वनी मर्यादांचे उल्लंघन करणारे डीजे,ध्वनिक्षेपक आणि नियमबाह्य फटाक्यांवर पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,महापालिका,पोलीस आणि वन विभागाच्या समन्वयातून संयुक्त पर्यावरणीय देखरेख यंत्रणा उभारावी,अशीही मागणी आहे.प्रदूषणाच्या नोंदींचा तुलनात्मक अहवाल प्रसिद्ध करून भविष्यात दोन्ही तलाव परिसरांसाठी कायमस्वरूपी पर्यावरणपूरक उत्सव नियमावली निश्चित करावी,असे निवेदनात नमूद केले आहे.प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यावर आधीच नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. उत्सवांचा जल्लोष निसर्गाच्या शांततेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर मात करणारा ठरू नये,यासाठी केवळ नियमांचे फलक नव्हे,तर प्रत्यक्ष वैज्ञानिक देखरेख आणि कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.
— डॉ. प्रशांत सिनकर, (पर्यावरण अभ्यासक , ठाणे)