इंदापूर येथील कर्मयोगी साखर कारखान्यावर काटा बंद आंदोलन
Raju Tapal
November 03, 2021
61
इंदापूर येथील कर्मयोगी साखर कारखान्यावर काटा बंद आंदोलन
मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे बील मिळत नसल्याच्या कारणावरून ऊस उत्पादक शेतक-यांनी आक्रमक होत पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कर्मयोगी कारखान्यावर मंगळवार दि.२/११/२०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून काटा बंद आंदोलन सुरू केले.
बिजवडी ता.इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला मागील वर्षीच्या गाळप हंगामात इंदापूर,माढा, करमाळा, दौंड,राशीन तालुक्यातील काही शेतक-यांनी ऊस घातला. त्यांना यंदा दिवाळी सणाच्या तोंडावर गाळप ऊसाचे पैसे न मिळाल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर व पोलीस कर्मचारी कारखाना कार्यस्थळावर आले. पोलीस निरीक्षक मुजावर यांनी कारखाना प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी नितीन शिरसकर यावेळी बोलताना म्हणाले, घरात सात माणसे आहेत. कारखान्याकडून २५ हजार रूपये येणे आहे. मात्र ते वेळेत न मिळाल्याने केवळ ५ हजार रूपयांसाठी वडिलांचा मृत्यू झाला असे सांगताना त्यांना रडू कोसळले.
वडशिवणे येथील शेतक-याने २०० टन ऊस कारखान्यास घातला. मात्र पैसे न मिळाल्याने ६ लाख रूपये कर्ज घरातील तीन कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी काढले. मात्र त्यामध्ये भावाचा मृत्यू झाला. त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला.
कारखाना प्रशासनाने कारखान्याचे अध्यक्ष ,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करून १५ नोव्हेंबरपर्यंत सर्वबील शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
Share This