इंधनावरील करात कपातीसाठी पुणे शहर भाजपाच्या वतीने महात्मा फुले मंडई परिसरात आंदोलन
Raju Tapal
November 10, 2021
43
पेट्रोल, डिझेल वरचा मुल्यवर्धित करामध्ये राज्य सरकारने कपात करावी, एस टी कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात ,आरोग्य विभागातील भरती परिक्षांमधील अनागोंदी कारभारावर नियंत्रण आणावे या मागण्यांसाठी पुणे शहर भाजपाच्या वतीने.महात्मा फुले मंडई परिसरात आंदोलन करण्यात आले.
प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यावर पट्टी बांधून करण्यात आलेल्या या आंदोलनात झोपेचे सोंग घेतलेल्या वसुली सरकारने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक , गणेश घोष , राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, स्वरदा बापट, अर्चना पाटील,प्रमोद कोंढरे, रविंद्र साळेगावकर, धनंजय जाधव यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ देशातील ११ राज्यांनी मुल्यवर्धित करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. मात्र केवळ हप्ता वसुली करण्यासाठी जनमताचा विश्वासघात करून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य नसल्याची टिका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यावेळी केली.
अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवून टिका करत असते. केंद्र सरकारने इंधनाचे भाव कमी केल्यानंतर राज्यातील आघाडीचा खरा चेहरा उघडा पडला आहे .इंधनावरील व्हॅट कमी केल्यास सर्वच वस्तूंच्या किंमती कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. परंतू हप्ता वसुली, बदल्यांमधील भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणे ,जनतेमध्ये दहशत निर्माण करणे हे राज्य सरकारचे प्राधान्यक्रम आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात इंधनावरील जिझिया कर सहन करावा लागत आहे अशीही टिका भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या आंदोलनात केली.
Share This