जामखेड आगाराच्या नगर जामखेड एस टी बसवर आष्टीजवळ दगडफेक
जामखेड आगाराच्या नगर - जामखेड एस टी बसवर बीड जिल्ह्यातील आष्टीजवळ दगडफेक करण्यात आल्याने एस टी कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
कामावर हजर झालेले कर्मचारी नगरहून जामखेड येथे प्रवासी घेवून निघाले होते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जामखेड आगाराची एम एच ४० ए क्यू ६२२४ या क्रमांकाची नगर - जामखेड एस टी बस नगरहून जामखेडकडे निघाली होती. ही एस टी बस गांधनवाडी फाटा येथे आली असता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. दगडफेक केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. बसचालकाने एस टी बस आष्टी बसस्थानकात नेऊन फिर्याद दिली. या दगडफेकीत कोणीही जखमी झालेले नसून कामावर हजर झालेल्या एस टी कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.