तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका",राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी थेट अध्यक्षांनाच सुनावलं,
Raju Tapal
December 22, 2022
41
"तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका",राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी थेट अध्यक्षांनाच सुनावलं,
तर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई!
दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. राहुल शेवाळेंनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंनी ४४ वेळा फोन केल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने केला.त्यानंतर आमदार नितेश राणेंनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढून विधानसभेत एसआयटी चौकशीची मागणी केली. या वरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी काढलेल्या उद्गारांमुळे विधानसभेतलं वातावरण तापलं आणि सत्ताधाऱ्यांनी थेट जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली, यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली!
नेमकं काय घडलं?
विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली.
अजित पवारांनीही केली विनंती.
“माझी विनंती आहे की आपण फक्त भास्कर जाधव यांना थोडं बोलण्याची परवानगी द्यावी. तिकडच्या १४ लोकांना बोलायची परवानगी दिली. मी इकडनं एकटा बोललो आहे. सभागृहं असं कसं चालवताय तुम्ही? आज फक्त भास्कर जाधवांना बोलू द्या म्हटलं तर तुम्ही ऐकत नाही विरोधी पक्षाचं. तुम्हाला सभागृह चालवायचं नाही का? आख्खा विरोधी पक्ष म्हणतोय की एका भास्कर जाधवांना बोलू द्या. ही आमची विनंती आहे”, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
दरम्यान,भास्कर जाधवांना बोलू देण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. भास्कर जाधवांनीही तशी मागणी करायला सुरुवात केली.”आमची हरकत आहे. १४ सदस्य समोरून बोलले, १४ वेळा कामकाज तहकूब केलं. आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय”, असं भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, याचवेळी जितेंद्र आव्हांडांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असं म्हटलं. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केलं. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली...
Share This