जीवाची पर्वा न करता गोळीबार करणा-या चोरट्यास पोलीसाने केले जेरबंद
Raju Tapal
February 12, 2022
54
जीवाची पर्वा न करता गोळीबार करणा-या चोरट्यास पोलीसाने केले जेरबंद ; पोलीस नाईक अंकूश केंगले यांची कर्तव्याला प्राधान्य देणारी कामगिरी
गोळीबार करून पळणारा चोरटा हातात पिस्तूल घेवून रस्त्याने धावत होता. त्याच्यामागे आरडाओरडा करत दोघेजण धावत होते. तेवढ्यात गस्तीवर असणारे पोलीस नाईक अंकूश केंगले यांनी पिस्तूलधारी व्यक्तीला त्यांच्या दिशेने येताना पाहिले.
पिस्तूलातील गोळी सुटली तर आपले काय होईल याचा जरासाही विचार न करता पोलीस नाईक केंगले यांनी कर्तव्याला प्राधान्य देत पिस्तूलधारी चोरट्यावर झडप घालून त्यास दोन्ही हातांनी जखडून ठेवले.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार गुरूवारी घडला.
मुकेश ताराचंद गुगलीया वय - ५० रा सनफ्लॉवर सोसायटी कोंढवा यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान असून गुगलीया व त्यांचा कामगार शुभम असे दोघेजण गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या दुकानात बसले होते. तेवढ्यात त्यांच्या दुकानात दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी तात्काळ दुकानाचे शटर बंद केले.त्यानंतर त्यांनी गुगलीयांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचेकडे पैसे व सोन्याची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे दागिने देण्यास नकार दिला.त्यामुळे एकाने त्याच्याकडील पिस्तुलामधून गुगलीया यांच्या दिशेने एक गोळी झाडली. गुगलीया यांनी गोळी चुकविल्याने ती भिंतीला लागली. त्याने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्याकडील पिस्तूल बंद पडले.
गुगलीया व त्यांच्या कामगाराने आरडाओरडा करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने शटर उघडून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एक चोरटा दुचाकीवरून पसार झाला. दुसरा चोरटा रस्त्यावरून पळू लागला. गुगलीया यांच्याकडील कामगार ,अन्य नागरिक चोरट्याच्या मागे धावू लागले.
त्याचवेळी गस्तीवर असणारे कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अंकूश केंगले तेथून जात होते. एक तरूण पिस्तूल हातात घेवून त्यांच्या दिशेने धावत येताना त्यांना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता पिस्तूलधारी तरूणाच्या अंगावर झडप घालून त्यास पकडले. त्याच्या हातातील पिस्तूल मोठ्या शिताफीने त्यांनी काढून घेतले.
याबाबतची खबर कोंढवा पोलीस ठाण्यास दिल्यानंतर सौद असिफ सय्यद वय -२४ रा. फैजाना मस्जिद जवळ मिठानगर कोंढवा या आरोपीस पोलीसांनी अटक केली. आरोपीचा साथीदार पसार झाला.
जीवापेक्षा कर्तव्य, जबाबदारी मोठी आहे हे लक्षात घेवून आरोपीला पकडल्याची प्रतिक्रिया पोलीस नाईक अंकूश केंगले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
Share This