कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक!
Raju Tapal
June 16, 2023
109
कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक!
आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे
कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आचार्य अत्रे रंगमंदिरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2023 अंतर्गत आयोजिलेल्या स्वच्छता विषयक विविध स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांचा, महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महापालिकेस सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा आणि स्वच्छतेच्या कामात चांगली कामगिरी बजाविलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सत्कार सोहळयासमयी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.
मी महापालिकेत रुजू झाल्यावर महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मला कचऱ्याचे ढिग/GVP (Garbage Vulnerable Points) दिसून येत होते. पण आज हे GVP कमी करण्यात आपण यश संपादन केले आहे, याचा अजून बराच पल्ला गाठायचा आहे. सध्या आपण कचरा प्रोसेसिंग, लॅण्ड फिलींग करीत आहोत आणि ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसही तयार करणार आहोत. महानगरपालिकेला आता कचरा प्रोसेसिंगला पैसे द्यावे लागणार नाहीत, उलट त्यातून महापालिकेला रॉयल्टी मिळेल अशी व्यवस्था आपण करीत आहोत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी दिली. तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात महापालिकेस सहकार्य केलेल्या सर्व N.G.O., नागरिक यांचे त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानाचे महापालिकेचे ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रुपींदर कौर, रुपाली शाईवाले यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्लास्टीकचा वापर शरीरासाठी कसा घातक आहे , एनजीओच्या माध्यमातून करण्यात येत असलेली स्वच्छता विषयक कामे याबाबत अतिशय माहितीपूर्ण सादरीकरण केले.
या कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाने आयोजिलेल्या जिंगल स्पर्धा चित्रकला स्पर्धा, पथनाटय स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा इ. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु. 5000/-, रु. 3000/- , रु.2000/- व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मोलाचे सहकार्य करणाऱ्या एनजीओ, इतर सामाजिक संस्था, स्वच्छता चॅम्पीयन, प्रभागात चांगली स्वच्छता राखणारे महापालिकेचे ह व ई प्रभागाचे सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यापुढे महापालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी विविध माध्यमातून महापालिकेस सहकार्य करणासाठी तयारी दर्शविलेल्या 5 नागरीकांना प्रातिनिधिक स्वरुपात "पर्यावरण रक्षक" म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील व सुत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले.
यासमयी महापालिका उपआयुक्त धैर्यशील जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे महापालिकेचे ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रुपींदर कौर, रुपाली शाईवाले व्यासपीठावर उपस्थित होत्या.
Share This