कल्याण पश्चिमेतून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना सेनेकडून (शिंदे) उमेदवारी
कल्याण : शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांचेच नाव पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे. भोईर यांचे नाव जाहीर झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील हे इच्छुक होते. मात्र पक्षाकडून येथील उमेदवाराचे नाव जाहीर होण्यास उशीर होत असल्याने शिवसैनिकांची उत्सुकता ताणली गेली होती. रविवारी रात्री शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या यादीत भोईर यांचे नाव कल्याण पश्चिम मतदार संघासाठी जाहीर झाले. ही बातमी येताच शहरातील शिवसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला. दरम्यान, पक्षाचा एबी फॉर्म घेण्यासाठी आमदार भोईर हे रात्रीच मुंबईला रवाना झाले होते.
विश्वनाथ भोईर हे मागील सत्रामध्ये आमदार होते. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा आ. भोईर यांनी शिंदे यांना साथ दिली होती. याच कारणामुळे विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असे मानले जात होते. अखेरीस भोईर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.