कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात
Raju tapal
October 18, 2021
38
कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात
कल्याण शीळ रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी दूरवर फेकली गेली आहे. गाडीचा चालक सुदैवाने बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. या नव्या भीषण अपघाताच्या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात होता. या दरम्यान पांडुरंगवाडी नजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्रटदाराने एक लोखंडी डिव्हायडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोराने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेले एका दुकानात सूरज भारद्वाज नावाचे रहिवासी झोपले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून त्यांनी रस्त्यावर धाव घेतली. यावेळी आणखी काहीजण आले. घटनास्थळी असलेल्या काहींनी गाडीतून आकाशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही.
Share This