पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल
पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी निवडणुकीसाठी एकूण ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या तीन दिवसांत ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरूवारी दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी एकाच दिवशी ५३ अर्ज दाखल झाले.
१४ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून जेष्ठ संचालक गोपाळ म्हस्के हवेली, रामचंद्र ठोंबरे मुळशी, बाळासाहेब ढमढेरे शिरूर, विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे आंबेगाव, माजी उपाध्यक्षा केशरताई पवार शिरूर, बाळासाहेब खिलारी जुन्नर, भगवान पासलकर वेल्हे, दिलीप थोपटे भोर, संदीप जगदाळे पुरंदर या प्रमुख संचालकांचा उमेदवारी अर्ज दाखल करणारांमध्ये समावेश आहे.
माजी संचालक रामभाऊ टुले, अरूण चांभारे, दुध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, जेष्ठ संचालक बाळासाहेब जयवंतराव ढमढेरे यांचा मुलगा स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे शिरूर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
जेष्ठ संचालक गोपाळ म्हस्के हवेली, रामचंद्र ठोंबरे मुळशी हे सलग नवव्यांदा दूध संघाच्या आखाड्यात उतरले आहेत. म्हस्के आणि ठोंबरे हे दोघेही १९८२ मध्ये पहिल्यांदा कात्रज डेअरीचे संचालक झाले होते.बाळासाहेब ढमढेरे शिरूर यांनी सलग आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला असून बाळासाहेब ढमढेरे हे १९८६ पासून दूध संघाचे सलग संचालक आहेत. विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे आंबेगाव हे सलग सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असून हिंगे हे १९९० पासून सातत्याने दुध संघावर संचालक आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे.