कल्याण-डोंबिवली पालिकेतील २८ नगरसेवकांचा अनधिकृत घरात निवास
Raju Tapal
January 08, 2023
1160
कल्याण-डोंबिवली पालिकेतील २८ नगरसेवकांचा अनधिकृत घरात निवास
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकूण दोन लाख ३५ हजार बेकायदा बांधकामे आहेत. अनधिकृत घरात निवास करणारे नगरसेवक सर्व पक्षीय आहेत.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील निर्वाचित १२२ आणि स्वीकृत पाच नगरसेवकांमधील एकूण २८ नगरसेवक अनधिकृत बांधकामांचा कर विभागाचा शिक्का असलेल्या घरात राहत असल्याचे माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. निर्वाचित २६ नगरसेवक आणि स्वीकृत दोन नगरसेवक यांचा या यादीत समावेश आहे.
नगरसेवक पती-पत्नीच्या घराचा आणि त्यांच्या मालमत्ता कर भरण्यासाठी लागणाऱ्या घराचा पत्ताच मालमत्ता कर विभागाला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. काही नगरसेवक प्रभाग अन्य ठिकाणी आणि राहतात दुसऱ्या ठिकाणी असे दिसून आले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकूण दोन लाख ३५ हजार बेकायदा बांधकामे आहेत. ही दोन्ही शहरे बेकायदा बांधकामांची नगरी कशी झाली आहेत हे डोंबिवलीत बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन उभारलेल्या ६५ बेकायदा इमारतींवरुन उघडकीला आले आहे. त्यामुळे या बांधकामांच्या मुळाशी कोण आहे हा मुद्दा आता चर्चेला आला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक म्हणून राहिलेल्या नगरसेवकांचे मूळ निवासाचे पत्ते आणि ज्या मिळकतीच्या आधारे नगरसेवक किंवा त्यांचा कुटुंब प्रमुख, मिळकतधारकाला पालिकेच्या कर विभागाकडून देयक पाठविले जाते. त्याची माहिती माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी पालिकेतून मागविली होती. कर विभागातून मिळालेल्या माहितीत नगरसेवकांच्या अनधिकृत घरातील निवासाचा प्रकार उघडकीला आला आहे. अनधिकृत घरात निवास करणारे नगरसेवक सर्व पक्षीय आहेत. अनधिकृत बांधकाम करणारे नगरसेवक चौकशीत दोषी आढळले तर ते निवडणूक लढविण्यासाठी सहा वर्षासाठी अपात्र ठरतात. मग, वर्षानुवर्ष अनधिकृत घरात राहणाऱ्या नगरसेवकांवर शासन, निवडणूक आयोग किंवा पालिकेकडून कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झाला आहे.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस बाधा न येता, असा शिक्का नमूद असलेल्या ज्या बांधकामांमध्ये नगरसेवक राहतात. त्यांची कर विभागाच्या दप्तरी असलेल्या नोंदीतील नावे पुढीलप्रमाणे आहेत. ॲड. हर्षाली थवील (वडवली-अटाळी), उपेक्षा भोईर (मांडा पूर्व), दयाशंकर शेट्टी (मोहने गावठाण), सुनंदा कोट( शहाड), छायाताई वाघमारे (बिर्ला काॅलेज प्रभाग), अर्जुन भोईर (खडकपाडा), तुप्ती भोईर (चिकणघर गावठाण), संदीप गायकर (ठाणकरपाडा),सचीन खेमा (जोशीबाग), पुरुषोत्तम चव्हाण(शिवाजीनगर), कविता विकास म्हात्रे(राजूनगर), विकास म्हात्रे(गरीबाचापाडा), जयेश म्हात्रे(मोठागाव), संगीता पाटील(ठाकुरवाडी), दीपेश म्हात्रे (आनंदनगर), वृषाली पाटीलृ-जोशी(शास्त्रीनगर), मंदार टावरे (आयरेगाव), मुकुंद पेडणेकर(म्हात्रेनगर), खुशबू चौधरी (सारस्वत काॅलनी), दर्शना शेलार(इंदिरानगर), राजेश मोरे (रघुवीरनगर), भारती मोरे (संगीतावाडी), सुनीता खंडागळे(गोळवली), संगीता विजय गायकवाड(चिकणीपाडा), देवानंद गायकवाड(तिसगाव),सारिका जाधव (भगवान नगर), प्रभुनाथ भोईर (कोळवली).
२००७ पर्यंत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ६७ हजार ९८७ बेकायदा बांधकामे होती. त्यानंतरच्या १४ वर्षात पालिका हद्दीत एक लाख ५१ हजार नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहिली. मागील तीन वर्षाच्या काळात ३१ हजार नवीन बेकायदा बांधकामे उभी राहिली. करोना महासाथीच्या काळात माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या काळात सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली, असे माहिती कार्यकर्ते गोखले यांनी दिली. एक वर्षात लहान मोठी सहा हजार बांधकामे उभी राहिली. ही सर्व माहिती आपण उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत नव्याने दाखल करणार आहोत, असे ते म्हणाले.
Share This