केडीएमसी स्मार्टसिटीचा भोंगाळ कारभार......
गेल्या १२ दिवसांपासून फेरीवाला पथकाला वाहनच नाही
अ प्रभागासह आय व एच वार्डातही हीच समस्या
दोन शिफ्ट मधील १२ कामगार बसूनच
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटीच्या गमजा कितीही मोठमोठ्या मारत असली तरी वरून दिखावा व आतून पोखरलेली व्यवस्था स्मार्ट सिटीचे नागडे रूप उघडे करीत आहे. अ प्रभाग क्षेत्रात गेल्या १२ दिवसांपासून फेरीवाला पथकाची गाडी नादुरुस्त असल्याने तिचे काम करून द्यावे किंवा अन्यथा दुसरी द्यावे असे वाहन विभागाला दोनदा पत्र देऊनही वाहन उपलब्ध होत नसल्याने फेरीवाला पथकामधील दोन शिफ्ट मधील कर्मचारी झाडाखाली बसून आपले दिवस ढकलत आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्रात फेरीवाला हटाव मोहीम,पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिंग्स काढण्यासाठी तसेच बांधकाम विभागासाठी दोन शिफ्ट मध्ये १२ कर्मचाऱ्यांसह एम.एच. ०५ /८९१५ या क्रमणकाचे डीएसीएम वाहन कार्यरत होते. मात्र अगदी जुनाट डब्बा झालेले वाहन हे कधी रस्त्यात बंद पडत होते. परिणामी कर्मचाऱ्यांना धक्का देऊन सदरील वाहनाचा वापर करावा लागत होता. त्यातच तब्बल १२ दिवसांपूर्वी सदरील वाहनामध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती,वायरिंगचे काम,इंजिनचे काम,डिझेल पाईप,संपूर्ण बॉडीच्या पत्र्याचे काम व इतर किरकोळ कामे करून देण्यासंबंधी मुख्यालयातील वाहन विभागाला कळवले होते. तसेच गाडीची अवस्था भंगार झाल्याने ती स्क्रॅप मध्ये कधीचीच लागणार आहे असे वाहनं विभागाने कळवले आहे. परंतु अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दोनदा यांत्रिकी वाहन विभागाचे उपअभियंता यांना पत्रव्यवहार करून पर्यायी गाडीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र तब्बल १२ दिवस उलटूनही यावर स्मार्ट सिटीच्या स्मार्ट अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने गेल्या १२ ते १३ दिवसांपासून अनधिकृत फेरीवाले,पोस्टर्स बॅनर काढणे याचे कामे स्थगित झालेले आहे.
याबाबत यांत्रिकी वाहन विभागाचे उपअभियंता यांनी अ प्रभागासाठी एक जीप भाडे तत्वावर मंजूरीसाठी फाईल पाठवलेली असून अद्याप तिच्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही असे कळवले आहे.
याबाबत आणखी माहिती घेतली असता केडीएमसीच्या आय ९ आणि एच वार्डात सुद्धा अशीच परिस्थिती असून तेथील वाहने सुद्धा नादरूस्त असल्याचे समजते.
याबाबत वाहन विभागाचे उपअभियंता प्रवीण पवार यानाच्याकडे विचारणा केली असता अ प्रभागाला भाडेतत्वावर वाहन देण्याचे ठरलेले असून अजून पर्यंत काही देण्यात आलेले नाही. अशी माहिती देत ते रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाने गमजा मारणारी केडीएमसी आपल्या प्रभागात वाहनेही वेळेवर पुरवू शकत नाही त्यामुळे शहरे होर्डिंग बॅनर ने बकाल झालेली दिसून येत आहेत. यावर नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल हे कितपत लक्ष देतात याकडे नागरिक डोळे लावून बसलेले आहेत.