केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती मराठा आंदोलकांच्या सावटाखाली
Raju Tapal
October 31, 2023
186
कार्यकर्ता मेळावा आणि नवीन बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती मराठा आंदोलकांच्या सावटाखाली
आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याची कुण कुण
कल्याण : कल्याण अत्रे रंगमंदिर येथील कार्यकर्ता मेळावा आणि मोहने येथील विश्वशांती सोसायटी मधील नवीन बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे लोकार्पण होणार आहे. मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यात मराठा समाज सर्वत्र आंदोलन करीत आहे.
जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणादरम्यान जरांगेनी पाणी सुद्धा पिण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील मंत्र्यांना घेराव घालणे मंत्र्यांच्या गाड्या अडवणे मंत्र्यांच्या गाड्या समोर काळे झेंडे दाखविणे आदी प्रकार मराठा समाज आक्रमकपणे करत आहे.
कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात काही मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे कल्याण दौऱ्यावर येतील की नाही यावर मराठा आंदोलनाचे सावट पसरले आहे.
नवीन बुद्ध विहाराला पहिलाच पावसात गळती
या नवीन बुद्ध विहाराच्या कामाकरिता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी 50 लाख रुपये निधी मंजूर केला होता आमदार नरेंद्र पवार हे गुजरात दौऱ्यावर असल्याने या बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाच्या कामाचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते झाले होते. मात्र या बुद्ध विहाराच्या कामात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून
बुद्ध विहाराचे काम घाई घाईने केल्याने बुद्धविहारास पहिल्याच पावसात गळती सुरू झाली होती याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुशील आरके यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडे केली होती.
या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय याचे उद्घाटन करू नये अशी आरके यांची मागणी होती परंतु भाजप पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने याचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे
आरपीआयचे कार्यकर्ते नाराज...
विश्वशांती सोसायटी गाळेगाव येथील बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भाजपने मोठमोठे होर्डिंग बॅनर लावले आहेत परंतु या होर्डिंग मध्ये
स्थानिक आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे फोटो नसल्याने आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती असताना भाजपने केवळ त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बॅनरवर फोटो लावल्याने आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याने आरपीआय समर्थकांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहीलच असे सांगता येत नाही.
या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून आरपीआयचे कार्यकर्ते नाराज झाल्यास आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसू शकतो. तसेच आरपीआयच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपातील वरिष्ठ नेते काय प्रयत्न करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Share This