खड्डे भरण्याचे काम ३ दिवसांत युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येईल !
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे
खड्डे भरण्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अचानक भेट देवून केली पहाणी !
पावसाने आता थोडीशी उघडीप दिल्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम येत्या ३ दिवसांत युद्ध पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. काल रात्री कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या खड्डे भरण्याच्या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देत कामाच्या दर्जाची त्यांनी पाहणी केली.
कल्याण डोंबिवलीत खड्डे भरण्याचे काम आधीही सुरूच होते. मात्र पावसाने उघडीप दिल्याने रविवार रात्रीपासून डांबरीकरणाने हे खड्डे भरण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत कल्याण डोंबिवलीतील बहुतांश रस्ते चांगल्या स्थितीत होतील ज्यामुळे गणपती बाप्पाचे आगमन सुकर होईल असा विश्वास या पाहणीनंतर महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दुर्गाडी येथील गणेश घाटाची पहाणी केली आणि उपस्थित अधिका-यांना योग्य त्या सूचना दिल्या.
या पहाणीवेळी महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, उप अभियंता शाम सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.