कुणाल कामरा प्रकरण !
हायकोर्टाने बजावली मुंबई पोलिसासह आमदारांना नोटीस !
मुंबई :- स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. या प्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी कामराने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली हाेती. या प्रकरणी न्यायालयाने आज (दि.८) मुंबई पोलिस आणि गुन्हा दाखल केलेल्या शिवसेना आमदाराला 'उत्तर द्या' नोटीस बाजवली असून, पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
न्यायालयाचे 'उत्तर द्या' निर्देश, १६ एप्रिलला होणार सुनावणी
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा 'गद्दार' असा उल्लेख केला होता. यारून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामराविरोधात गुन्हा दाखल झाला हाेता. कामराने न्यायालयाकडे गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. पोलिस आणि तक्रारदार आमदार पटेल यांना सूचना घेऊन याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणात पुढील सुनावणी आता बुधवार १६ एप्रिल २०२५ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.
शिवसेना आमदाराने दाखल केला कामराविरोधी FIR
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामराविराेधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. कामरा याला अनेक वेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावले होते. त्याने चौकशीसाठी हजर राहणे टाळले. यानंतर त्याने दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर बुधवार १६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कामराचे २०२१ पासून तामिळनाडूमध्ये वास्तव्य
तीन समन्स बजावल्यानंतरही पोलिसांसमोर हजर न झालेल्या या कॉमेडियन कुणाल कामरा याने ५ एप्रिल रोजी एफआयआर रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. कामरा यांचे वकील, ज्येष्ठ वकील नवरोज सेर्वाई यांनी न्यायालयाला माहिती दिली की, कॉमेडियन कामराने त्यांच्या जीवाला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचे कारण देत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कामरा त्यांच्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे २०२१ पासून तामिळनाडूमध्ये राहत आहे.
कामराच्या याचिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अधिक भर
कामराच्या याचिकेत नमूद केलेल्या युक्तिवादात म्हटले आहे की, त्याचे विधान राजकीय घटनांवर, विशेषतः शिवसेनेतील फूट आणि २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या संदर्भात केले गेले होते. त्यामुळे त्याच्याविरोधीत दाखल केलेला एफआयआर (FIR) हा त्याच्या मूलभूत अधिकारांचे विशेषतः भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे आणि जीवन आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. कामराच्या कायदेशीर टीमने "हा गंभीर गुन्हा नाही, तर विनोदी सादरीकरणातून उद्भवलेला गुन्हा आहे. त्यामुळे कामरावर चौकशी सुरू ठेवणे हे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन ठरेल, जे स्वातंत्र्य भारतीय संविधानानुसार संरक्षित आहे, असेही म्हटलं आहे.