लग्नाचे व-हाड घेवून निघालेली १७ सीटर मिनीबस जळून खाक ; मुळशी तालुक्यातील भूगाव येथील घटना
------------------------
लग्नाचे व-हाड घेवून निघालेल्या १७ सीटर मिनी बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना मुळशी तालुक्यातील भूगाव येथे घडली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते.
या बसमधून प्रवास करत असलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठी हानी टळली.
सागर भाग्यवान कवडे रा.धायरीफाटा ता.हवेली यांच्या मालकीची असलेली ही बस पिरंगुट येथून हडपसरला निघाली होती. या बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते. मिनीबस भूगाव येथे पोहचल्यावर बसच्या रेडिएटर जवळून अचानक धूर येवू लागला.
चालकाने ताबडतोब मिनीबस रस्त्याच्या बाजूला घेतली. बसमधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.
बसमधील प्रवासी तातडीने खाली उतरताच बसने मोठा पेट घेतला.या आगीत बस जळून खाक झाली .
आग विझविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दोन परांजपे फॉरेस्ट ट्रेल्स येथील एक अशा एकूण तीन अग्निशामक गाड्या याठिकाणी आल्यानंतर आग आटोक्यात आणली.