लालपरी अडचणीत;
एसटीची श्वेतपत्रिका जाहीर;
१० हजार कोटींचा संचित तोटा
मुंबई :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिका आज जाहीर झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीचे एकूण महसुली उत्पन्न, खर्च, कर्ज,आणि देयके किती आहेत? याबाबतचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका मांडली आहे. या श्वेतपत्रिकेत 45 वर्षाचा अवलोकन करण्यात आले आहे, या 45 वर्षांपैकी फक्त आठ वर्षेच महामंडळाला काही प्रमाणात नफा झाला आहे उर्वरित सर्व वर्षात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचं समोर आले आहे.
सोमवारी मांडलेल्या श्वेतपत्रिकेनुसार,एसटी महामंडळाचा 2018-19 मध्ये 4603 कोटी रुपये तोटा होता तो मार्च 2023 अखेर 10324 कोटी रुपये तोटा झालेला आहे. 2024-25 मध्ये 1217 कोटी रूपयांचा तोटा अपेक्षित आहे,राज्य सरकारने 2001 पासून 6353 कोटी रुपयांची भांडवली मदत केली आहे. 2020 ते 2023 या काळात 4708 कोटींची महसुली मदत सरकारने केली आहे. तर वैधानिक स्वरूपाची देणी 3297 कोटी रुपयांची देणी बाकी आहेत तोट्याच्या कारणामध्ये बसेस कमी असणे, तोट्याची फे-या,अनियमित भाडेवाढ, खाजगी वाहतूक यांचा समावेश आहे.
परिवहन विभागातील आर्थिक तोटा आर्थिक बाबी आर्थिक व्यवहार याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनीच श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्वेतपत्रिका काढण्यात आली. एसटी महामंडळाचा सुमारे 10 हजार कोटी संचित तोटा असून महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकांचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते. कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे. महामंडळाला इंधन, वस्तु व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणीही द्यायची आहेत.
रवर्षी पाच हजार बसेस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर आपल्याला उत्पन्न वाढवता येईल असा प्रस्ताव मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मांडला होता. त्याला मंजुरी दिली आहे. हे काही अवघड काम नाही, शेवटी सामान्यांचा एसटीवर विश्वास आहे लालपरीवर प्रेम आहे. एसटी महामंडळाची सद्याची वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडली आहे. आमच्या कार्यकाळात एसटी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न होईल,असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या कार्यकाळात कोणत्याही एसटी बसेस भाडेतत्वावर घेणार नाही त्याचा फायदा फक्त ठेकेदारांना होतो. मी ड्रायव्हर,कंडक्टरला भाडे तत्वावर घेऊन महामंडळाला पुढे नेण्यास प्रयत्न करु. कर्नाटक,गुजरातमध्ये मी जाऊन आलो. कर्नाटकमध्ये लांब पल्ल्याच्या वोल्वो बसेस भाडेतत्वावर होत्या. तो पॅटर्न आपण राज्यात राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी 10,000 वोल्वो बसेस तयार करत आहोत,अशी महत्त्वाची घोषणाही यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.