• Total Visitor ( 369643 )
News photo

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत..?

Raju Tapal February 12, 2023 96

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत?



मुंबई:-महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींकडे राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे कोश्यारी अडचणीत आले होते. विरोधकांनी राज्यपालांच्या विधानांवरुन भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. तसंच राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर कोश्यारींनी दिलेला राजीनामा राष्ट्रपतींकडून स्वीकारण्यात आला असून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



कोण आहेत रमेश बैस?



रमेश बैस हे मूळचे छत्तीसगढच्या राजपूरचे आहेत. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ सालचा असून ते ७५ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तर त्याआधी त्रिपुराच्या राज्यपालपदाचाही कारभार सांभाळला आहे. भाजपचे सदस्य असून १९९९ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.



नगरसेवक पदापासून सुरुवात



१९७८ सालापासून रमेश बैस यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९७८ ते १९८३ पर्यंत ते रायपूरमधून नगरसेवक राहिले होते. पुढे ते मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यपदी निवडून गेले. मध्य प्रदेश विधानसभेच्या अनुमान समिती, पुस्तकालय समितीचे सदस्य राहिले आहेत. मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.१९८९ साली ते रायपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून लोकसभेत गेले. त्यांनी काँग्रेसच्या कैयर भूषण यांचा पराभव केला होता. पुढे १९९४-९६ मध्ये मध्य प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. १९९६ साली ते रायपूरमधून पुन्हा खासदार बनले आणि यावेळी त्यांनी धनेंद्र राहू यांचा पराभव केला. १९९८ साली ते तिसऱ्यांदा खासदार बनले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विद्याचर शुक्ला यांचा पराभव केला. तिनही वेळेस काँग्रेस वेगवेगळे उमेदवार देऊन बैस यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी रमेश बैस यांनाच कौल दिला.



१९९८ साली मंत्रिपद



१९९८ साली रमेश बैस यांची केंद्रीय पोलाद आणि खाण राज्यमंत्रिपदी नियुक्ती केली गेली. १९९९ साली बैस चौथ्यांचा खासदार बनले. २००४ साली बैस यांची पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅससंबंधीच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली. रमेश बैस तब्बल ७ टर्म लोकसभा खासदार म्हणून कारकिर्द भूषवली आहे.



मोदी सरकारच्या काळात राज्यपाल



मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीला रमेश बैस यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर बैस यांना झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदाची धुरा असणार आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement