महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटेना
Raju tapal
October 21, 2024
81
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटेना;
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
मुंबई:-काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी होणारी बैठक जागा वाटपाच्या निर्माण झालेल्या तिढ्यामुळे रद्द झाली. काँग्रेसचे जे नेते दिल्लीत पोहोचले आहेत, त्यांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य प्रमुख नेत्यांनाही आज सोमवारी दिल्लीत बोलावले आहे. आज या नेत्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समवेत बैठक होणार आहे.
विदर्भातील काही जागांवर वाटपाची चर्चा अडकली आहे. ज्या जागा काँग्रेस अनेक वर्ष जिंकत आली आहे, त्या जागा देखील आम्हाला दिल्या पाहिजेत असा आग्रह ठाकरे गटाने आहे. वांद्र्यात झिशान सिद्दिकी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. ती जागा ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांच्यासाठी हवी आहे. कुलाबा, भायखळा या जागासाठीही त्यांचा आग्रह आहे. संपूर्ण कोकण आम्ही ठाकरे गटासाठी दिला आहे. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. ज्या भागात ज्यांची ताकद आहे, त्या भागात त्यांनी उमेदवार उभे करावेत असे ठरलेले असतानाही, ठाकरे गटाकडून काही नेते विशिष्ट जागांसाठी आग्रह धरत आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ती बैठक सकारात्मक झाली असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र रविवारी पुन्हा काँग्रेसच्या ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी ठराविक जागेसाठी आग्रह धरला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची आपापसात चर्चा झाली आणि आजची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द करून सोमवारी बैठक घेण्याचे ठरले.
दरम्यान, रविवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. तर माजी मंत्री काँग्रेसचे नेते नसीम खान हे दिल्लीचा निरोप घेऊन शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यांनी दिल्लीच्या कोणत्या नेत्यांशी शरद पवार यांचे बोलणे करून दिले हे समजले नाही. शरद पवार आणि ठाकरे गटात जागावाटपांचे काय झाले याविषयी माहिती समोर नसली तरी काही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर दोघांचाही आग्रह असल्याने हा तिढा वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेसाठी आमचे अनेक नेते त्यांना ही जागा घेऊ नका असे सांगत होते, तरीही ठाकरे गटाने तो विषय प्रतिष्ठेचा विषय केला. त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे ही भूमिका ठेवून तिन्ही पक्षांनी वस्तुस्थितीचा विचार करून जागा वाटप करावे अशी आग्रही भूमिका दिल्लीने मांडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी साठी सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
Share This