ठरलंय तर अडलंय कुठं?
महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही?
सर्वसामान्यांमधून विचारला जातोय सवाल
मुंबई :- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जवळपास ठरल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. पण महायुतीचं जर ठरलंय मग महायुतीचा मुख्यमंत्री जाहीर का होत नाही? असा सवाल आता सामान्यांकडून विचारला जात आहे. मुख्यमंत्री निवडीत आपला कोणताही अडथळा नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेची आता थोडी भाषा बदलली आहे. भाजपनं खुशाल मुख्यमंत्री निवडावा असं मुख्यमंत्री सांगत नाहीयेत. मुख्यमंत्री अजून ठरायचा आहे. तीन नेते बसून मुख्यमंत्री ठरवू असं एकनाथ शिंदे सांगू लागले आहेत.
शिवसेना नेतेही आडून आडून मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा आहे हे सांगायला विसरत नाहीत. पण शेवटी बोलताना दिल्लीतले नेते सांगतील ते मुख्यमंत्री असतील असंही ते सांगतात. महायुतीतला तिसरा भागीदार असलेली राष्ट्रवादीची भूमिका मात्र अगदी स्पष्ट आहे. मुख्यमंत्री काहीही झालं तरी भाजपचाच होणार असं राष्ट्रवादी ठासून सांगत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तर निकालाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं सांगतायेत. त्याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केलाय. महायुतीत सगळं काही अलबेल असेल पण मुख्यमंत्रिपदावरुन अलबेल आहे हे आता मात्र सांगता येणार नाही.
ज्याअर्थी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर होत नाही त्याअर्थी भाजपच्या दाव्याला मित्रपक्षांपैकी कुणाचा तरी विरोध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे राज्यात पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादामुळे हे नाव जाहीर करण्यास उशीर केला जातोय. सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका मांडलेल्या एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची चर्चा रखडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद निश्चित करण्याकरता भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाने निरिक्षकांची नावे जाहीर केली आहेत.