जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा मुख्याध्यापका विना
मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत ज्येष्ठ शिक्षक निवृत्तीच्या जवळ पोहोचले
अमरावती :- दर्जेदार शिक्षणामुळे जिल्हातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याची खंत पालकवर्गातून होत आहे. जिल्हा परिषदेने उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती संदर्भात यादी प्रसिद्ध केली.परंतु मुख्याध्यापक पदोन्नती न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अनेक
शाळांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शालेयस्तरावर निर्णय घेण्यास अनंत अडचणी येत असून महत्त्वाचे निर्णय घेण्यासही विलंब होत आहे.शाळेतील शिक्षकांना अध्यापन करून
उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदाचा प्रभार सांभाळावा लागत आहे.त्यामुळे प्रभार सांभाळणाऱ्या शिक्षकांवर ताण येत आहे.उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे महत्त्वाचे पदे लवकरात लवकर भरावीत,अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
अनेक शाळांवर आता प्रभारी मुख्याध्यापक असून त्यांच्यावरच मुख्याध्यापकांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर या प्रभारीपदाचा परिणाम होत आहे. तसेच, जे वरिष्ठ शिक्षकांनी आता मुख्याध्यापक होण्याची पात्रता पूर्ण केली आहे, त्यांनाही या पदाची आस लागली आहे. विशेष म्हणजे पदोन्नतीसाठी पात्र असलेले ज्येष्ठ शिक्षक आता निवृत्तीच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे किमान निवृत्त होताना तरी पदोन्नती व्हावी, अशी त्यांची आशा आहे.
शाळेच्या व्यवस्थापनासाठी, प्रशासनासाठी उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद महत्त्वाचे पद आहे.दर्जेदार शिक्षणासाठी शाळेत ठोस उपाययोजनांची गरज आहे.त्यामुळे उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे महत्त्वाचे पद भरणे आवश्यक आहे.
राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती