राज्यात उन्हाचा चटका वाढला;
मार्च महिना अधिक तापदायक ठरणार
मुंबई :- राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा कहर सुरु झाला आहे. विविध भागांत तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिना संपला असून मार्च महिना सुरु झाला आहे. या मार्च महिन्यात नेमकं तापमान कसं असेल असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर याबाबतची माहिती जेष्ठ हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे एक ते दोन आठवडे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ अपेक्षित असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. कोकणात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमान वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढलाय. मुंबईसह कोकणातील शहरं तापली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या शहरांमध्ये 38 अंश सेल्सियसवर तापमान गेलंय. उष्णतेची धग प्रचंड वाढलीय. नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. बुधवारी बहुतांश महाराष्ट्रात तापमान प्रचंड वाढलेले होते. मराठवाडा विदर्भात चांगलीच रखरख वाढली आहे.
मध्य महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होतेय.दरम्यान, येत्या तीन दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात येत्या 24 तासांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकण गोवा, मुंबई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ही तापमानस्थिती कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात सध्या कोरडे व शुष्क हवामान असून प्रचंड तापमान वाढलं आहे.