सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा
विधानभवनातील राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले
मुंबई :- महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय.गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय गुरुवारी संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. आता याच प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन घडलेल्या प्रकाराबाबत आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?,कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र? अशी उद्गिग्न प्रतिक्रिया विधानभवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंनी दिली आहे. वाट्टेल त्या लोकांना पक्षात घेण्यानं असं घडतंय, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.काल विधानभवनात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली.ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला,'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?'सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन,'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर,आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून पण यांचं काय? सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा.जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही,मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका,असेही राज ठाकरे म्हणाले.