मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिरोडा येथील अभियंत्याचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेबरला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
निखिल राजू उपरकर वय -३२ रा. साई कॉलनी तिरोडा, गोंदीया असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
तिरोड्यातील अभिय़ंता निखिल उपरकर हे त्यांचे वडील राजू वय - ६० बहीण नेहा वय - २९ यांच्यासोबत मॉर्निंग वॉकला जात होते. तिरोडा - तुमसर मार्गावरून मॉर्निंग वॉक करून परत येत होते.
गणेश सर्वो पेट्रोल पंपासमोरून चालत असताना पाठीमागून येणा-या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली.
चालक प्रणव मुकेश उके वय - २२ याला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
वाहनाच्या धडकेने निखिल दहा फूट अंतरावर फेकले गेल्याने त्यांचा पाय मोडून डोक्याला मार लागल्याने ते ठार झाले.लग्नाच्या पाहुण्यांची गाडी थांबवून निखिल व नेहाला उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी निखिल यांना मृत घोषित केले.
निखिल हे पुणे येथे कॅप जेमिनी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. निखिल यांचे काका भास्कर उपरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगंदळ या घटनेचा तपास करत आहेत.