श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठाशी तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचा सामंजस्य करार
शिरूर :- श्रीलंका येथील कॅंडी शहरानजीक असलेल्या केलेनिया विद्यापीठ आणि तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय यांच्यामध्ये शैक्षणिक आदान प्रदान उपक्रमांतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. केलेनिया विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख आणि समाज विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.जी. अमरसिंघे, पंजिया भूगोल संघाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे, डॉ. पराग चौधरी, भूगोल विभागप्रमुख डॉ. रवींद्र भगत आदी याप्रसंगी उपस्थित होते.
महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या पुढाकाराने श्रीलंका येथील केलेनियाय विद्यापीठाशी केलेल्या शैक्षणिक सामंजस्य कराराअंतर्गत भविष्यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी सांगितले. या मैत्री करारा अंतर्गत श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने तळेगाव ढमढेरे महाविद्यालयातील विविध विद्या शाखेतील प्राध्यापकांना सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी सांगितले. याशिवाय तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात देखील भूगोल विषयाअंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भविष्यात केले जाईल. त्यानिमित्ताने देशाबाहेरील विविध अभ्यासक महाविद्यालयात येणार असल्याचेही प्राचार्य डॉ. अर्जून मुसमाडे यांनी सांगितले. प्रस्तुत सामंजस्य करारांतर्गत तळेगाव ढमढेरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील भविष्यात आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकल्प सादर करण्याची आणि संशोधनपर लेखन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख डॉ. पराग चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या सामंजस्य कराराचा हेतू स्पष्ट केला.