मुरबाड नगर पंचायतीच्या सर्व जागा दिव्यांग उमेदवार लढविणार
Raju Tapal
December 09, 2021
46
मुरबाड नगर पंचायतीच्या सर्व जागा दिव्यांग उमेदवार लढविणार - मेघना तुषार जोशी
'राजकारण' हे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, याच ध्येयासक्तीने मुरबाड नगरपंचायतच्या सर्वच्या - सर्व जागा दिव्यांगजन लढविणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुरबाड शहराध्यक्ष सौ. मेघना तुषार जोशी यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायतीच्या १७ वॉर्डातील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रथम:च आरक्षणनिहाय दिव्यांग बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत शहराध्यक्ष मेघना जोशी यांनी आपल्या पक्षाचा 'राजकीय हेतू' स्पष्ट करताना सांगितले की, नगरपंचायतमध्ये आमच्या दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करणारे व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन काम करणारे लोकनियुक्त नगरसेवक आम्हाला अपेक्षित असल्याने ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील,आणि मुरबाड तालुकाध्यक्ष एस.एल. पाटील यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाने प्रहार जनशक्ती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
नगरपंचायतमध्ये ५ % निधी वाटपासंदर्भातील अनियमितता, मुख्यालयातील चढ-उतार व आसन व्यवस्थेतील असुविधा, दिव्यांग स्टॉल, जागतिक अपंग दिन- कर्णबधिर दिन - पांढरी काठी दिनातील आयोजनाबाबतची उदासीनता, दिव्यांगांच्या मूलभूत सुविधा व उपक्रमांबाबत अजूनही प्रशासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते किंबहूना याबाबत निवेदन, मोर्चा, आंदोलनाद्वारे संबंधितांचे लक्ष वेधूनही अपेक्षित स्वरूपाची कार्यवाही वेळेत होत नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाई बरोबरच सभागृहातील लढाई लढलो तर आपले प्रश्न प्रभावीपणे मांडून आपल्याच समस्यांवर याद्वारे दीर्घकालीन उपाययोजनाचा भाग ठरू शकतो; याच शाश्वत आशावादावर निवडणूक लढविण्याबाबत कोअर कमिटीचा शिक्कामोर्तब झाला असून शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांग जनांची याबाबत निग्रही भूमिका झाली आहे.
Share This