गोमातेच्या सन्मानासाठी देशव्यापी आंदोलन ! आज मालेगावात भजन-संकीर्तन मिरवणूक!
मालेगाव:-भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय स्थान असलेल्या गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा मिळावा आणि गोवंश हत्येवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी,या प्रमुख मागण्यांसाठी २७ एप्रिल २०२६ रोजी देशभरात व्यापक जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मालेगाव शहरात गोसन्मान अभियान समितीच्या वतीने भव्य भजन-संकीर्तन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील गोरक्षक,गोसेवक,विविध हिंदुत्ववादी संघटना,साधुसंत तसेच गोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून,त्याच्या तयारीचा भाग म्हणून ठिकठिकाणी जनजागृतीही करण्यात येत आहे. मालेगावातील मिरवणुकीची सुरुवात सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळा येथून होईल. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात भजन-संकीर्तन करत ही मिरवणूक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे गायीला 'राष्ट्रमाता'चा सन्माननीय दर्जा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच गोवंश हत्येवर कठोर कायदे करून संपूर्ण देशभरात १०० टक्के गोहत्या बंदी लागू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. हे निवेदन तहसीलदारामार्फत पंतप्रधान,राष्ट्रपती,मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. गोरक्षणाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे सर्वांसाठी शक्य नसले, तरी आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून प्रशासनासमोर आपली भूमिका मांडण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. मालेगाव आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या श्रद्धा,परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. अध्यात्मिक मार्गाने लक्ष वेधणार या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आंदोलनात्मक पवित्रा न घेता, ‘भजन संकीर्तना’च्या माध्यमातून अध्यात्मिक आणि शांततापूर्ण मार्गाने सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. सध्याच्या काळात गोवंशाचे अर्थकारण आणि पर्यावरण रक्षणातील महत्त्व लक्षात घेता,गोवंश हत्याबंदीचा कायदा अधिक प्रभावी होण्याची गरज तज्ज्ञांकडून देखील व्यक्त होत आहे. तसेच गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असला तरी मालेगाव शहरात छुप्या मार्गाने गोवंशाची कत्तल होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याची तक्रार गोरक्षकांकडून सातत्याने होत आहे. अवैध पद्धतीने होणाऱ्या गोवंश जनावरांची वाहतूक रोखतांना गोरक्षक व कसायांमधील वाद मालेगाव शहर व ग्रामीण भागात नेहमीच घडत असतात. या पार्श्वभूमीवर,या मिरवणुकीत शहर व ग्रामीण भागातून मोठा जनसमुदाय सहभागी होण्याची शक्यता आहे.