• Total Visitor ( 84378 )

निवडणुकाच अवैध ठरवा

Raju Tapal February 15, 2022 36

निवडणुकाच अवैध ठरवा! पराभव समोर दिसू लागताच भाजपची उच्च न्यायालयात धाव कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या महापालिका निवडणुकांत (Municipal Election) एकदा तृणमूल काँग्रेसने (TMC) आघाडी घेतली आहे. राज्यात चार महापालिका निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. तृणमूलने चारही महापालिकांमध्ये आघाडी घेतली असून, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप (BJP) पिछाडीवर पडला आहे. यानंतर भाजप नेत्यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दोन महापालिकांतील मतदानच अवैध ठरवा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपची पिछेहाट होत असताना भाजपने आज कोलकता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महापालिका निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा भाजपने उपस्थित केला असून, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याचबरोबर विधाननगर आणि असनसोल महापालिकांच्या निवडणुकांत बोगस मतदान झाल्याचाही दावा भाजपने केला आहे. याचबरोबर राज्यात 27 फेब्रुवारीला होणाऱ्या 108 नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी केंद्रीय सशस्त्रे दले तैनात करावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत भाजपने काल निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. विधाननगर आणि असनसोल महापालिकांचे मतदान अवैध ठरवावे, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत बोलताना भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, मतदारांना लुटण्यात आले असून, निष्पक्ष पद्धतीने ही निवडणूक झाली नाही. निकालातून हेच समोर येत आहे. सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षमुक्त निवडणुका हव्या आहेत. यासाठी सरकारी यंत्रणांसह निवडणूक आयोगाचा वापर केला जात आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आहोत. राज्यातील विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चार महापालिकांची निवडणूक 12 फेब्रुवारीला झाली होती. आज या चारही महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विधाननगरमध्ये 41 पैकी 39 जागा मिळवून तृणमूलने झेंडा फडकावला आहे. याचवेळी काँग्रेसला केवळ एक तर भाजपला भोपळाही फोडता आला नाही. असनसोल महापालिकेतील 106 जागांपैकी 54 जागांवर तृणमूलने आघाडी घेतली आहे. याचवेळी भाजप 4 जागांवर पुढे आहे. चंदननगर महापालिकेत 32 पैकी 19 जागांवर तृणमूल काँग्रेस पुढे आहे. डाव्या आघाडीला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे. सिलिगुडी महापालिकेत 47 पैकी 38 जागांवर तृणमूल आघाडीवर असून, भाजप आणि डावी आघाडी प्रत्येकी चार जागांवर पुढे आहे. चारही महापालिकांत तृणमूलने बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवून भाजप, काँग्रेससह डाव्या पक्षांना धूळ चारली आहे. राज्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने काही दिवसांपूर्वी कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. कोलकता महापालिकेतील 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या. त्यामुळे इतर महापालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले होते.

Share This

titwala-news

Advertisement