पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल पुण्यातील विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांकडून जल्लोष करण्यात येवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहर कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी म्हणाले, कायदे तर रद्द झाले परंतू इतके दिवस शेतक-यांचे हाल करून मोदी सरकारने काय मिळवलं ?हा प्रश्न कायम विचारला जाईल .आज कायदे मागे घेता येतील. परंतू या अन्याय्याच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या शेकडो शेतकरी बांधवांचे प्राण परत येतील का ?
यावेळी जय जवान जय किसान ,शेतकरी एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, बाळासाहेब बोडके, निलेश निकम, मृणालिनी वाणी, शुभम माताले, महेश हांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसभवन येथे फटाके वाजवून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले ,कडाक्याची थंडी,ऊन ,पावसामध्ये शेतक-यांनी आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास ६०० शेतक-यांना जीव गमवावा लागला.याला जबाबदार कोण ? याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे.येत्या निवडणुकीत देशातील जनता भारतीय जनता पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही.
शेतक-यांच्या एकीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकारला हा कायदा रल्द करावा लागला.
माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागूल, ऍड. आभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब आमराळे, वाल्मिक जगताप, राजेंद्र पडवळ, सुनील दैठणकर रजनी त्रिभुवन, दुर्गा शुक्रे, प्राची दुधाणे, संगिता क्षीरसागर ,ज्योती परदेशी आदी पदाधिका-यांसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने साखर वाटून पुण्यात जल्लोष करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यावेळी म्हणाले, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे ७०० शेतकरी शहीद झाले. उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे पाठीमागे घेतलेले आहेत. दीड वर्षानंतर मोदी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामध्ये शेतक-यांचे हित असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे आम्ही अभिनंदन करतो. केंद्र सरकारने अधिवेशनामध्ये अधिकृत हे कायदे रद्द करावेत.फसवू नये.
संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, महादेव मातेरे,मराठा सेवा संघाचे दौंड तालुकाध्यक्ष समीर मोहिते, किर्तीकुमार घोरपडे, दिलीप सावंत, रणजित खंडागळे, नंदकुमार मोहिते, डॉ. खंडू जगताप, नितीन वाघेरे् यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित ह़ोते.
तीन अन्याय्यकारक कृषी कायदे पंतप्रधानांनी मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर किसानबाग आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी आनंद व्यक्त केला.
इन्क्रेड्रिबल समाजसेवक ग्रुपचे अस्लम बागवान यांनी पत्रक काढून आनंद व्यक्त केला आहे.
बागवान यांनी पुण्यात किसान बाग आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ दिवस सत्याग्रह केला होता. राज्यात तसेच राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात जावून आंदोलनात सहभाग घेतला होता. पुणे ते दिल्ली, मोटरसायकल यात्रा, पुणे ते मुंबई सायकल यात्रा काढली होती.