• Total Visitor ( 85070 )

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

Raju Tapal October 08, 2022 33

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर*
नाशिकमध्ये आज पहाटे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर या खासगी बसने पेट घेतला. यामध्ये होरपळून हे मृत्यू झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.

नाशिक इथल्या बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. याबद्दल ट्वीट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाशिक इथल्या दुर्घटनेबद्दल ऐकून दुःख झालं. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

आज पहाटे नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका इथं एका खासगी प्रवासी बसला कंटेनरची धडक बसली. त्यानंतर या बसने पेट घेतला. यामध्ये १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढवण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. शिवाय जखमींवर मोफत सरकारी उपचार होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री तातडीने नाशिककडे रवाना झाले आहे.

Share This

titwala-news

Advertisement