पराभवाची हॅट्रिक साधा;निवडणुकीला सामोरे जा
Raju tapal
October 19, 2024
72
पराभवाची हॅट्रिक साधा;निवडणुकीला सामोरे जा!
दिपक केसरकरांनी राजन तेलींच्या 'वर्मा'वरच ठेवलं बोट
माहूर (जिल्हा नांदेड):- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज माहूर येथे दर्शनासाठी आले असता माध्यमांनी त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राजन तेली यांच्या बाबतीत प्रश्न विचारल्यावर केसरकर यांनी राजन तेली यांना पराभवाची हॅट्रिक करायची असेल तर त्यांनी निवडणुकीला समोर जाण्याचा सल्ला देत आव्हानच दिले आहे.
तळकोकणामध्ये राजकीय शिमगा सुरु झाला आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
मागील दोन टर्म मध्ये राजन तेली दीपक केसरकरांच्या विरोधात उभे होते मात्र ते दोन्ही वेळा पराभूत झाले. यंदा ते शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून उभे राहिल्यास त्याचा कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारला होता. त्यावर केसरकर म्हणाले," राजन तेली यांना पराभवाचा हॅटट्रिक साधायची असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे.
दिपक केसरकर म्हणाले "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते जेव्हा पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर नंतर त्यांनी भाजपचा एबी फॉर्म लावला आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे राहणार आहे.ज्या राणे साहेबांनी त्यांना मोठे केले त्यांच्या पासून ते दूर गेले, रस्त्यावर स्टॉल चालविणाऱ्या माणसाला राणे साहेबांनी राजकीय प्रवाहात आणले त्यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिले नाहीत,असे दीपक केसरकर म्हणाले.
तीन पिढ्यांचा ऐश्वर्य सोडून आम्ही सामजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेले आहे,आता मुख्यमंत्र्यांशी बोलून मी महाराष्ट्राच्या जबाबदारीतून मुक्त होऊन फक्त कोकणची जबाबदारी अंगावर घेणार असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
आज पहाटेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे माहूर येथील दत्त शिखर गडावर दर्शनासाठी आले होते, दत्तप्रभू व महंत महाराज यांच्या दर्शनानंतर केसरकर यांनी रेणुका देवीचे दर्शन घेऊन ते मार्गस्थ झाले.
Share This