• Total Visitor ( 429990 )
News photo

सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचा प्लास्टिक पुनर्वापर उपक्रम

Raju tapal July 04, 2025 55

सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचा प्लास्टिक पुनर्वापर उपक्रम

मुख्याधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे कौतुक



प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाचे औचित्य साधून केंद्राला दिली भेट



चिपळूण:- पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने चिपळूण शहर आणि परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे संचालक भाऊ काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरमहा जवळपास दहा टन प्लास्टिकचा पुनर्वापर केला जात असून, यामुळे शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनात मोठे योगदान मिळत आहे, अशी प्रशंसात्मक भावना चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी व्यक्त केली.



जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाचे औचित्य साधून गुरुवारी मुख्याधिकारी भोसले यांनी खेर्डी एमआयडीसी येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर केंद्राला भेट दिली. त्यांनी या केंद्रातील प्रक्रियांची सविस्तर माहिती घेतली. या वेळी आरोग्य निरीक्षक सुजित जाधवही त्यांच्यासोबत उपस्थित होते. संचालक भाऊ काटदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७०० नागरिक या उपक्रमात सहभागी झाले असून, नागरिकांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पाठवल्यानंतर कर्मचारी घरोघरी जाऊन प्लास्टिक संकलित करतात. जमा झालेल्या प्लास्टिकचे आठ प्रकारांमध्ये काटेकोर वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर त्याचा पुनर्वापर केला जातो.



हा वापरलेला प्लास्टिक केवळ साठवून ठेवला जात नाही, तर पर्स, लॅपटॉप बॅग यांसारख्या उपयुक्त वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरला जातो. यासोबतच थर्माकोलचाही पुनर्वापर या केंद्रात करण्यात येतो. पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून दहा लोकांना रोजगाराची संधीही प्राप्त झाली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र आणखी विस्तारण्यासाठी लवकरच प्लास्टिकपासून दोऱ्या तयार करणारे यंत्र आणण्यात येणार असून, त्यामुळे पुनर्वापर प्रक्रियेत नव्या उत्पादनांची भर पडणार आहे. यावेळी मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, या केंद्राचे कार्य केवळ पुनर्वापर पुरते मर्यादित नसून, हे शहराच्या स्वच्छतेसाठी एक महत्त्वाचे योगदान आहे. नागरिकांनी अधिकाधिक प्लास्टिक गोळा करून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडे सुपूर्त करावे, ही एक सामूहिक जबाबदारी मानून कृती केली पाहिजे. या उपक्रमाच्या माध्यमातून चिपळूण शहरात प्लास्टिकमुक्तीसाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जात असून, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे हे कार्य पर्यावरणाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement