पुण्यातील मुळा मुठा नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचा जीव वाचविण्यात यश
---------------------
नव-यासोबत भांडण झाल्याने तिने कर्नाटकातून थेट पुणे गाठले. पुण्यात आल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी तीन दिवस वणवण फिरून काम मिळविण्याचा तिने प्रयत्न केला. शेवटी निराश झाल्याने मुळा मूठा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचविण्यात यश आले.
नागम्मा मलिक कांबळे असे या ५० वर्षीय महिलेचे नाव असून त्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील कुरूळी गावच्या रहिवासी आहेत.
तीन दिवसांपूर्वी नागम्मा यांचे नव-यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्या कर्नाटक येथून पुणे येथे काम शोधण्यासाठी आल्या होत्या.
तीन दिवस काम शोधूनही मिळाले नाही. निराशेमुळे त्यांनी जीव देण्याकरिता मुळा मूठा नदीत उडी मारली.
नागम्मा कांबळे नदीमध्ये वाहून जाताना स्थानिक नागरिकाने पर्णकुटी पोलीस चौकीत माहिती सांगितली. पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे यांनी तात्काळ फायर ब्रिगेडशी संपर्क साधून माहिती दिली.
येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना कळवून वाहून जाणा-या महिलेला फायर ब्रिगेडच्या मदतीने बाहेर काढून जीवदान दिले.