राहू - वाघोली रस्त्याची खड्डे पडून दुरवस्था
दौंड तालुक्यातील राहू - वाघोली ता.हवेली रस्त्याची खड्डे पडून अतिशय दुरवस्था झालेली आहे.
राहू, पाटेठाण, न्हावी सांडस, सांगवी सांडस, अष्टापूर फाटा, वाडेबोल्हाई, केसनंद या गावांतील नागरिक, प्रवासी , वाहनचालक या रस्त्यावरून प्रवास करत असतात. वाडेबोल्हाई येथील बोल्हाई देवी पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध देवस्थान असून भाविकही या रस्त्यावरून प्रवास करत असतात. या रस्त्यावर पाटेठाण येथे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना तसेच गुळ उत्पादकांची बरीच गु-हाळे असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाची वाहतूक ट्रॅक्टर, ट्रक या वाहनांद्वारे खड्डे पडून दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून ऊस तोडणी हंगामात केली जात आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ऊस वाहतूक करणारी वाहने हेलकावल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुचाकी वाहनचालकांना खड्डे चुकवत या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
हवेली तालुक्यातील अष्टापूरहून उरूळी कांचन गावाकडे जात असलेल्या रस्त्याचीही दुरवस्था झालेली आहे.
अष्टापूर गावाजवळ वळण रस्ता असून वळण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. उरूळी कांचन गावाकडे अष्टापूर गावाहून जाताना मुळा मुठा नदीवर पूल असून या पुलाजवळही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.
पुलाजवळच्या रस्त्याच्या कडेला मुरूमाचे ढीग असल्यामुळे अरूंद रस्त्यामुळे पुलाजवळील रस्ता वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणीचा ठरत आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याचे काम ब-याच दिवसांपासून थांबविण्यात आल्याचे समजते.
भवरापूर पुलावरील रस्ता उरूळीकांचन येथे पुणे - सोलापूर महामार्गाला तसेच अष्टापूर फाटा येथे राहू - वाघोली रस्त्याला जोडलेला आहे. या रस्त्याचा वापर शिरूर तालुक्यातील प्रवासी, वाहनचालक उरूळीकांचन, सासवड, जेजुरी ,श्री क्षेत्र नारायणपूर,केतकावळे येथील बालाजी, कापूरहोळ, भोर कडे जाण्या- येण्यासाठी करत असतात.
खड्डे पडलेल्या रस्त्याची खड्डे बुजवून दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.