राहुल नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी,
दिपक केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली;
प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
मुंबई:-राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षाचे नेते आणि अपक्षांनी मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचे फॉर्म भरले.यावेळी उमेदवारांनी आपापल्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगापुढे सादर केला. यामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महायुतीच्या सात नेत्यांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांनी 7 नेत्यांची नावं ट्विट केली आहेत. यामध्ये गीता जैन, पराग शाह, राहुल नार्वेकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. अपक्ष आमदार असेल्या गीता जैन यांची संपत्ती 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 70.44 कोटी इतकी होती. मात्र, त्यांनी यंदा सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा आकडा 392.30 कोटी रुपये इतका आहे. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांमध्ये गीता जैन यांची संपत्ती तब्बल 322 कोटी रुपयांनी वाढला आहे.
तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांची संपत्ती 2019 मध्ये 38.09 कोटी रुपयांची होती. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीचा आकडा 129.81 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार असलेल्या पराग शाह यांची संपत्तीही कैकपटीने वाढली आहे. 2019 साली पराग शाह यांची संपत्ती 500.62 कोटी इतकी होती. तर 2024 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पराग शाह यांच्या संपत्तीचा आकडा 3383.06 कोटी रुपये इतका नमूद करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये 26 कोटी रुपयांची वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 रुपये इतकी होती. गेल्या पाच वर्षात यात 26.12 कोटींची वाढ झाली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये इतकी झाली आहे.
एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांची संपत्ती 2019 मध्ये 6 कोटी 11 लाख इतकी होती. यात गेल्या पाच वर्षात 22 कोटी 85 लाख रुपयांची वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांची पत्नी लता शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे. एकनाथ शिंदे यांचे 2024 चे वार्षिक उत्पन्न 34 लाख 81 हजार रुपये आहे. तर, पत्नी लता शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाख 83 हजार इतके आहे.