• Total Visitor ( 84446 )

राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार

Raju tapal October 18, 2024 27

ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, 
राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार

एकाच कुटुंबातील घराणेशाही मान्य नसल्याचे सांगत,राणे कुटुंबीयांवर खच्चीकरणाचे आरोप करीत राजन तेलींनी भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा भाजप वरिष्ठांकडे दिला राजीनामा

सिंधुदुर्ग :-राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात फारसे यश मिळवता आले नव्हते.या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने आता कोकणातील भाजपच्या नेत्याला गळाला लावून अनपेक्षित डाव टाकला आहे. माजी आमदार राजन तेली हे आज शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजप आणि राणेंसाठी किमान लहानसा धक्का म्हणावा लागेल.

राजन तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. नारायण राणे यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप यावेळी तेली यांनी केला. राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत होईल, असे दिसत आहे.

राजन तेली यांची गणना एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थकांमध्ये व्हायची. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान राणे कुटुंबीय आणि राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. याठिकाणी राजन तेली यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे राजन तेली यांनी म्हटले होते. यानंतर राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी वातावरण प्रचंड तापले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाली होती.

दीपक केसरकरांसमोर आव्हान?

राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर आणि राजन तेली हे कट्टर वैरी मानले जातात. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी राजन तेली आग्रही होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने त्यांची मागणी गांभीर्याने न घेतल्याने राजन तेली आता ठाकरे गटात जाणार आहेत. दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने मोट बांधली आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनीही दीपक केसरकरांना लक्ष केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत केसरकर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

एकाच कुटुंबातील घराणेशाही मान्य नसल्याचे सांगत,राणे कुटुंबीयांवर खच्चीकरणाचे आरोप करीत राजन तेलींनी भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा भाजप वरिष्ठांकडे दिला राजीनामा

एकाच कुटुंबाला एक लोकसभा दोन विधानसभा आणि त्यांच्याच कलेने तिसरी विधानसभा उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. घराणेशाही मला मान्य नाही. राणे कुटुंबीयांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत आहोत, असा दावा माजी आमदार राजन तेली यांनी केला. ठाकरे सेनेची मशाल हाती घेत असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा भाजपच्या वरिष्ठांकडे दिला आहे.आपण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु राणे कुटुंबियांकडून तसेच पक्षांतर विरोधकांकडून आपल्यावर वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement