राज्यभरातील शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान ; जानेवारी ते एप्रिल दरम्यान उपक्रमाचे आयोजन
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या साहाय्याने शंभर दिवस वाचन अभियान सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. बालवाटिका ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
वर्गातील वातावरण आनंददायी राखण्यासह विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून देणे, गोष्टींचा शनिवार ,रीड अलाऊड,अशा मोबाईल उपयोजनांच्या वापराबाबत विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन ,वस्तीस्तरावर वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम,वाचनमेळावे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ,मराठी भाषा गौरवदिन ,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आदी उपक्रम राबविले जातील त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती ,जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षणसंस्था ,जिल्हा परिषद, महापालिकेचा शिक्षणविभाग अशा स्तरांवर उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम डी सिंह यांनी ही माहिती परिपत्रकाद्वारे पत्रकारांना दिली.
वाचन अभियानाच्या अंमलबजावणीबाबत अहवाल आणि ध्वनिचित्रफिती तयार कराव्यात, अभियानविषयी समाजमाध्यमांमध्ये १०० डेजरिंडगकॅम्पेन आणि पढेभारत हे इंग्रजी हॅशटॅग वापरून प्रचार करावा असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.