रस्त्याच्या कडेला असलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्याची रांजणगाव ग्रामपंचायतीकडून कार्यवाही
शिरूर:- पुणे -अहिल्यानगर महामार्गाच्या कडेला असलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही रांजणगाव ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती गावापासून शिरूरच्या दिशेने अर्धा किलोमीटर अंतरावर पुणे -अहिल्यानगर महामार्गाच्या डाव्या बाजूला बाभूळसर गावाला जाणा-या रस्त्याच्या जवळ (वळण काॅर्नरजवळ) ब-याच दिवसांपासून कच-याचा मोठा ढीग साठलेला होता. श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असून साठलेल्या कच-याच्या ढीगामुळे रांजणगाव गणपती गावाच्या सौंदर्याला बाधा होत असून कच-याच्या ढीगातील प्लॅस्टिक पिशव्या वा-यामुळे पुणे -अहिल्यानगर महामार्गावरून प्रवास करणा-या दुचाकीस्वारांच्या दुचाकीच्या चाकात अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा आशयाची बातमी टिटवाळा न्यूज ने ब-याच दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. टिटवाळा न्यूजचे शिरूर प्रतिनिधी विजय ढमढेरे ( दि.२९ एप्रिल रोजी ) शिरूरला जाताना कच-याच्या ढीगातील कचरा ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये भरत असल्याचे पत्रकार विजय ढमढेरे यांच्या निदर्शनास आले. पुणे -अहिल्यानगर महामार्गाच्या कडेला असलेल्या कच-याच्या ढीगाची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीने केल्याने प्रवाशांनी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आभार मानले.