सध्या देशभरात वाराणसीतील ज्ञानवापी मशीद व मंदीर याबाबत वादविवाद सुरू असल्याने त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शीघ्र कृती दलाच्या तुकडीने प्रतापगडावर अफजलखानाच्या कबर परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
शीघ्र कृती दलाचे नवी मुंबईचे असिस्टंट कमांडर स्वप्निल पाटील यांच्यासह ५० जवान व क्यूआरटी चे १५ जवान महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली.
कमांडंट स्वप्निल पाटील, पोलीस उपअधिक्षक शीतल जानवे -खराडे, पोलीस निरीक्षक देवकर, पोलीस निरीक्षक भरणे, शांतता समितीचे सदस्य रोहित ढेबे, सलिम बागवान, नगरसेवक अफजल सुतार, युसूफ शेख, प्रकाश पाटील, महेश गुजर, अशोक शिंदे व नागरिक बैठकीस उपस्थित होते.
ज्ञानवापी मशिद व मंदीर या अनुषंगाने जातीय तणाव निर्माण होणार नाही ,संभाव्य मशीद मंदीर वाद या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
महाबळेश्वरातील नागरिकांनी व्हाटस अँप व इतर ऐकीव बातम्यांकडे लक्ष दे्वू नये, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा असे आवाहन करून जातीय तणाव निर्माण झाल्यास उपाययोजनेबाबतच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या.
शीघ्र कृती दलाच्या जवानांनी प्रतापगड पायथ्यालगत असलेल्या अफजलखान कबर परिसराची पाहणी केली.
शीघ्र कृती दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. कबरीजवळ बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचा-यांना स्वप्निल पाटील यांनी खबरदारीच्या सुचना केल्या.