यंदा खरीप हंगामाच्या दरम्यान बीड जिल्ह्यात ११ वेळा अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले. असे असतानाही बीड जिल्हा प्रशासनाने पाली महसूल मंडळातील गावांना वगळले.
त्यामुळे पाली मंडळातील २५ ते ३० गावांच्या शेकडो शेतक-यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले. या शेतक-यांना अनुदानाचा लाभ मिळालाच पाहिजे या मागणीसाठी सरपंच संघटनेने बीड - मांजरसुंबा या मार्गावरील पाली येथे रास्ता रोको केला
नुकसानग्रस्त शेतक-यांची भिस्त फक्त अनुदानावरच होती. जिल्हा प्रशासनाने केवळ पाली मंडळातच नव्हे तर आष्टी तालुक्यातही असाच प्रकार केला आहे.
नुकसान होवूनही शेतक-यांना मदतनिधीपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय गेल्या १५ दिवसांपासून या शेतक-यांचाही समावेश करून घेण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली. मात्र अद्याप दखल घेण्यात आली नाही. यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजप पदाधिका-यांनीही पाठिंबा दर्शविला.
या शेतक-यांना मदत मिळाली नाही तर जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरपंच संघटनेने दिला आहे.