सत्तासंघर्षांचा आज निकाल
Raju Tapal
May 11, 2023
72
सत्तासंघर्षांचा आज निकाल
शिंदे सरकारच्या भवितव्यासह घटनात्मक गुंतागुंतीचा उलगडा होण्याची शक्यता
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील सत्तासंघर्षांवर आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची घटनात्मक वैधता निश्चित होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सकाळच्या वेळात राज्य सरकारचे भवितव्य ठरविणारा हा महत्त्वाचा निकाल देईल.
शिवसेनेमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने हंगामी स्थगिती दिली होती. त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले व राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे हंगामी आदेश, शिवसेनेतील फूट, आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका आदी विविधांगी सखोल चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली होती. न्या. हिमा कोहली, न्या. एम. आर. शहा, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. कृष्ण मुरारी यांचा या घटनापीठात समावेश होता. १० महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर घटनापीठाने १६ मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता.
समिलगी विवाहासंदर्भातील खटल्याची सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी गुरुवारची सुनावणी सकाळी ११ ऐवजी दुपारी १२ नंतर घेऊ असे सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्या अधिकारकक्षा आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष या दोन महत्त्वाच्या खटल्यांच्या निकालाचे वाचन केल्यानंतर समिलगी विवाहावरील सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. गुरुवारी सरन्यायाधीशांसमोर सादर होणाऱ्या तातडीच्या याचिकांवरील सुनावणी घेतल्यानंतर घटनापीठ सत्तासंघर्षांवरील निकालाच्या आदेशाचे वाचन करणार आहे.
आज निकाल का?
घटनापीठातील एक सदस्य न्या. एम. आर. शहा १५ मे रोजी निवृत्त होणार असल्याने हा निकाल या आठवडय़ामध्ये लागणे अपेक्षित होते. घटनापीठासमोर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस सुनावणी होते. सोमवार व शुक्रवारी घटनापीठ शक्यतो कामकाज घेत नाही. शनिवार-रविवार न्यायालयाला सुट्टी आहे. शहा यांच्या कामकाजाचा सोमवारी अखेरचा दिवस असून त्यादिवशी घटनापीठाचे कामकाज होण्याची शक्यता नाही. त्यामुळे घटनापीठाचे कामकाज गुरुवारी होणार असल्याने दोन्ही खटल्यांचे निकाल उद्याच जाहीर होतील.
निकालाच्या केंद्रस्थानी असलेले मुद्दे..
Share This