• Total Visitor ( 84496 )

मुंबई विद्यापीठामधील शिक्षकीय पदांच्या मान्यतेचा घोटाळा

Raju tapal December 06, 2024 22

मुंबई विद्यापीठामधील शिक्षकीय पदांच्या मान्यतेचा घोटाळा

अपुऱ्या व बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारांवर महत्वाच्या पदांना मुंबई विद्यापीठाची मान्यता

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांनी चक्क अपूर्ण व बोगस कागदपत्रांच्या आधारे मुंबई व उपनगरांतील नामांकित कॉलेजेसमधील नियुक्त्यांना मान्यता दिल्याचे उघडकीस आलेले आहे. या सर्व नियुक्त्या  प्राचार्यसारख्या अत्यंत महत्वाच्या पदांसाठी आहेत. त्यांची मान्यता देताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम धाब्यावर बसविण्यात आलेले असून या घोटाळ्यामधून कुलगुरू  व उपसंचालकांनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा केलेली आहे, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (एसआयटी) माहितीच्या अधिकारांतून मिळालेल्या कागदपत्रांतून हाती लागलेली आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या कल्याण शहरातील (पश्चिम) गांधारी परिसरात के. एम. अग्रवाल कॉलेज (KM Agrawal College of Arts,Commerce and Science) आहे. या कॉलेजमध्ये अनिता मन्ना (Anita Manna) यांची १९९४ साली असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्या याच कॉलेजमध्ये २००८ साली प्राचार्य म्हणून काम पाहू लागल्या. 

सन १९९४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठ व कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागाकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांच्या यादीमध्ये त्यांनी एसएससी म्हणजेच दहावीचे मार्कशीट व प्रमाणपत्र सादर केलेलेच नव्हते, अशी माहिती 'स्प्राऊट्स'च्या टीमला माहितीच्या अधिकारांतून मिळालेली आहे. 

अनिता मन्ना यांनी २००८ साली प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला, हा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे निकषाचे शैक्षणिक कागदपत्रे सादर केली, मात्र यामध्ये त्यांनी पीएचडीचे प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याचे आढळून येते. 

मन्ना यांनी मुंबई विद्यापीठ (Mumbai University) व महाराष्ट्र सरकारच्या कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागाकडे अपूर्ण व बोगस कागपत्रे सादर केलेली आहेत, त्याचा गांभीर्याने तपास करण्यात यावा व त्यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी याच कॉलेजमधील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सिंह (Krishna Singh) यांनी पनवेल येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी (Prof. Ravindra D. Kulkarni) यांच्याकडे केलेली आहे. मात्र या कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या नियमबाह्य पद्धतीने नेमणूक झालेल्या प्राचार्य व त्यांच्यासारख्या असंख्य अपात्र कर्मचाऱ्यांची अद्याप हकालपट्टी झालेली नाही. 

अवघ्या आठ महिन्यांत दहावी व बारावी परिक्षा उत्तीर्ण

अनिता मन्ना या १९८३ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठ महिन्यांत म्हणजेच १९८४ साली त्या बारावीची परीक्षाही उत्तीर्ण झाल्याची माहिती, 'स्प्राऊट्स'च्या टीमला माहितीच्या अधिकारातून मिळालेली आहे. 

सीएचएम कॉलेजच्या प्राचार्यही वादाच्या भोवऱ्यात

उल्हासनगर येथील चांदीबाई हिंमतलाल मनसुखानी कॉलेजच्या (Smt. Chandibai Himathmal Mansukhani College, CHM College, Ulhasnagar) प्राचार्य मंजू लालवानी- पाठक (Manju Lalwani-Pathak) यांनीही त्यांचे दहावीचे मार्कशीट व प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडे अद्याप सादर केलेले नाही, तरीही त्या याच कॉलेजमध्ये  मागील २६ वर्षांपासून कार्यरत आहेत, अशी धक्कादायक माहितीही 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT) माहितीच्या अधिकारांतून मिळालेल्या कागदपत्रांतून हाती आलेली आहे. 

कुलगुरू व सहसंचालक मालामाल

कल्याणमधील अग्रवाल कॉलेजमध्ये असंख्य पदांवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या झालेल्या आढळून आलेल्या आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कलगुरू व महाराष्ट्र राज्याच्या पनवेल विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांनी कथितरित्या कोट्यवधी रुपयांचा मलिदा गोळा केलेला आहे, असे 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला आढळून आलेले आहे.  

कुलगुरूंचा कथित भ्रष्ट कुलसचिवांना आशीर्वाद
  
अकील शेख (Assistant Registrar, Aqueel Shaikh ) हे मुंबई विद्यापिठाचे उपकुलसचिव आहेत. मान्यता देण्याबाबत व त्यासंबंधी माहिती देण्याचे काम त्यांच्याकडे असते, मात्र या अधिकाऱ्याचे व अपात्र कर्मचाऱ्यांचे कथितरित्या आर्थिक संबंध आहेत, त्यामुळेच अशा अपात्र उमेदवारांना अधिकृतरीत्या मान्यता देण्यात येते व त्यासंबंधीची माहितीही दडविण्यात येते, असा आरोप कृष्णा सिंह यांनी 'स्प्राऊट्स'शी बोलताना केला. 

या गैरव्यवहाराबाबत 'स्प्राऊट्स'च्या टीमने प्रतिक्रियेसाठी कुलगुरू प्रा. कुलकर्णी, सहसंचालक डॉ. नारखेडे व प्राचार्य अनिता मन्ना, मंजू लालवानी- पाठक, शेख यांना वारंवार संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

Share This

titwala-news

Advertisement