• Total Visitor ( 134286 )

महानगरपालिकेच्या शाळांची सुरक्षा सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत!

Raju tapal January 20, 2025 37

महानगरपालिकेच्या शाळांची सुरक्षा सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत!

महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता महानगरपालिकेच्या एकूण 61 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आलेले आहे.

 दिनांक 21/ 8 /2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार खाजगी, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते, त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले असून माहे फेब्रुवारी 2025 अखेरीस महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी व काही  आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक राहील. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.

महापालिकेच्या एकूण 61 शाळांमध्ये विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांचे सुरक्षिततेकरिता एकूण 502 कॅमेरे बसविण्यात येणार असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांचे कक्षेत सीसीटीव्ही मॉनिटर बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे  कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
 

Share This

titwala-news

Advertisement