श्री घोरपडादेवी मंदिर परिसरात पर्यटकांची लघुशंकेसाठी गैरसोय
५ वर्षांपासून बिनपगारी काम करतायेत भीमा किसन पवार
राजू टपाल.
अकोले :- अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या भंडारदरा धरण व रंधा फॉल पर्यटकांचे आकर्षण केंद्र बिंदू आहे. इथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ दिसते. तर पावसाळयात येथील रंधा फॉल मधील धबधब्यावरून पडणारे पाणी पाहण्यासाठी मुंबई,पुण्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र इथे येणाऱ्या पर्यटकांना लघुशंकेसाठी तिथे असलेल्या शौचालय वापरण्यासाठी पाच रुपये प्रति व्यक्ती द्यावे लागत असल्याची खंत पर्यटकांनी व्यक्त केली. तर तिथे काम करणारे कर्मचारी भिमा किसन पवार यांना गेल्या पाच वर्षांपासून एक छदामही शासनाकडून मिळत नसल्याने त्यांना पर्यटकांकडून पैसे आकारावे लागत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, रणद खुर्द येथील रंधा फॉल परिसराचा विकास माजी आमदार वैभव पिचड यांनी पाच वर्षांपूर्वी करून तिथे पर्यटकांना राहण्यासाठी निवास्थान व शौचालयाची उभारणी केली होती. मात्र आज घडीला तेथील पर्यटन स्थळाची दुरावस्था झाल्याची पाहण्यास मिळत असून येथे करण्यात आलेले निवास्थानाच्या दारे,खिडक्या गायब झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी बांधलेले निवासस्थान आज घडीला भकास झालेले आहे. तर त्याच्या जवळच असलेल्या शौचालयाची देखील दुरावस्था झालेली असून त्याच्या ही दारे खिडक्या तुटलेल्या स्थितीत आहे.शौचालयात पाण्याची सुविधा नसल्याने तिथे पार्किंग मध्ये काम करणारे भीमा किसन पवार हे पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून नदीवरून बादलीच्या सहाय्याने पाणी आणून तेथील ड्रम भरून ठेवत आहे. त्यासाठी ते शौचालयाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून मानसी पाच रुपये घेतात नाहीतर शौचालयाला कुलूप बंद करून ठेवतात. त्यातच ते दहा किलोमीटर अंतरावरून इथे येत असल्याने त्यांना घरी जायचं असल्याने एसटी पकडण्यासाठी सायंकाळी पाच वाजताच शौचालयाला टाळे लावून जावे लागते. तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी त्यांना ५०० रुपये पगार देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आज पर्यंत एक छदामही त्यांना मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. इथे येणारे काही पर्यटक पैसे देण्यावरून भांडतात तर काही जण स्वखुशीने देऊन टाकतात. तर काही जण त्यांना पगार मिळत नसल्याची खंत देखील व्यक्त करतात. इथे येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी पैसे घेतले जातात मात्र त्यांना काहीच सुविधा मिळत नाहीत. अश्यातच एखाद्या महिला पर्यटकांना सायंकाळी ५ नंतर शौचालयाचा वापर करायचा असल्यास खूपच बिकट परिस्थिती निर्माण होत आहे.
एकीकडे माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे पुत्र माजी आमदार वैभवराव पिचड यांचे घोरपडादेवी मंदिराच्या बाहेरच येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी बॅनर लावून स्वागत केले जाते. मात्र परिसरातील असुविधा मात्र पर्यटकांची नाराजी ओढावुन घेत आहे.
एकंदरीत याकडे शासनाने लक्ष देऊन इथे येणाऱ्या पर्यटकांना किमान सुविधा त्या मिळण्याकरिता लक्ष दिले गेले पाहिजे असे पर्यटकांचे म्हणणे आहे.
-----------------------------