टीईटी निर्णयाविरोधात रविवारी मूक मोर्चा
अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
अमरावती: शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडल्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने ९ नोव्हेंबरला रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व शिक्षकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा,असे आव्हान मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी केले आहे.तसेच अमरावती येथे ९नोव्हेंबरला सकाळी ११वाजता ईर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अमरावती जिल्हा समन्वय शिक्षक समितीने केले आहे. राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आक्रमक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता,मात्र त्यापूर्वीच १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी टीईटीबाबत शासनाच्यावतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात येईल,असे सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अवगत केले होते. या आश्वासनानंतर संघटनेचा मूक मोर्चा स्थगित करण्यात आला होता. शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची सर्वोच्च न्यायालय पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली नाही. यामुळे शासनाच्या विरोधात ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आहेत प्रमुख मागण्या १)टीईटी परीक्षा रद्द करा,या प्रमुख मागणीसह शिक्षण सेवक पद्धत रद्द करण्यात यावी. २)१५ मार्च २०२४चा संच मान्यता शासन आदेश रद्द करण्यात यावा. जुनी पेन्शन योजना लागू करा. सर्व ऑनलाइन कामे रद्द करा. ३)राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा ही सेवासातत्यासाठी गृहीत धरण्यात यावी. शिक्षकांमध्ये अस्वस्थता,पदोन्नत्यादेखील थांबल्या टीईटी संदर्भामध्ये शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून,अनेक जिल्हा परिषदेच्या पदोन्नत्या थांबलेल्या आहेत. पदोन्नती होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. आश्रमशाळेतील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण न झाल्यास वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.