सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी शासनाच्या मदतीचा धनादेश नाकारला
परभणी:-न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देऊ केलेली १० लाखांची मदत नाकारली आहे. धनादेश देण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक मृत सोमनाथ सुर्यवंशीच्या घरी पोहोचले असता त्याच्या कुटुंबीयांनी हा धनादेश नाकारला आहे. तर सुर्यवंशी कुटुंबियांनी महायुती सरकारच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधान प्रतिकृतीची एका व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली. त्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने मुख्य बाजारपेठ भागात दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या, रास्तारोको केला. त्यानंतर दुसर्या दिवशी आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले.
यासोबतच काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर, भीम आर्मीचे खा.चंद्रशेखर आझाद यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. या मंडळींनी परभणीत येऊन सुर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी या मंडळींसह शासनाचे प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेल्या अनेकांनी सुर्यवंशी कुटुंबियांच्या म्हणणे ऐकून घेतले. सोमनाथच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी आणि कुटुंबास किमान ५० लाखांची मदत मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. त्यावर प्रतिसाद देत मदतीचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शासनाकडून याबाबत अजून कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याचे सुर्यवंशी कुटुंबियांचे म्हणणे आहे. दरम्यान, या कुटुंबियांनी अकोला येथे जाऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेऊन आपली मागणी पूर्ण झाली नसल्याची तक्रार केली